'इमरान-कपिल किंवा Independence सिरीज जे हवंय ते': माजी पाकिस्तानी कर्णधार वकार युनूसनेही भारत-पाक मालिकेचे केले समर्थन
दोन्ही देशांतील बहुसंख्य क्रिकेट चाहते भारत-पाकिस्तान द्विपक्षीय क्रिकेटच्या बाजूने असतील, असे वकार म्हणाले.
मागील अनेक वर्षांपासून भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) क्रिकेट मालिका खेळली गेली नाही. पण, पाकिस्तानचे माजी कर्णधार आणि महान वेगवान गोलंदाज वकार युनूस (Waqar Younis) म्हणाले की नजीकच्या काळात भारत-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका खेळतील असा त्यांचा विश्वास आहे. दोन्ही देशांतील बहुसंख्य क्रिकेट चाहते भारत-पाकिस्तान द्विपक्षीय क्रिकेटच्या बाजूने असतील, असे वकार म्हणाले. दोन आशियाई दिग्गजांमधील द्विपक्षीय मालिका ही 'विश्व क्रिकेटमध्ये सर्वात मोठी हिट' ठरेल असे वकार यांचे मत आहे. सीमापारहुन होणाऱ्या दहशतावादी हल्ल्याचं कारण देत भारताने पाकसोबत खेळण्यास नकार दिला आहे आणि दोन्ही देश फक्त आयसीसीच्या स्पर्धेत आमने-सामने येतात. माजी पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी, रमीझ राजा यांनीही भारत-पाक क्रिकेट मालिकेला पाठिंबा दर्शवला होता, पण भारतीय खेळाडूंनी सध्याच्या घडीला शक्य नसल्याचं मत व्यक्त केलं होतं आणि वकार यांनीही भारत-पाक मालिका व्हायला हवी असं मत व्यक्त केलं आहे. (पाकिस्तानचे माजी गोलंदाज वकार यूनुस यांचा ट्विटर अकाउंट हॅक; पॉर्न व्हिडिओला केले ‘लाईक’, किळसवाण्या कृतीमुळे सोडले सोशल मीडिया)
“जर तुम्ही जाऊन पाकिस्तान आणि भारत यांनी एकमेकांना खेळावे की नाही याविषयी दोन्ही देशातील लोकांना विचारले तर त्यातील जवळपास 95% लोक सहमत होतील की या दोघांमधील क्रिकेट खेळले जावे,” असे वकार यांनी ग्लोफॅन्सला Q टी-20 च्या चॅट शो दरम्यान सांगितले. "इम्रान-कपिल सिरीज किंवा इंडिपेन्डेन्स सिरीज…तुम्हाला जे नाव द्यायचंय ते नाव द्या. पण सध्याच्या घडीला भारत-पाक मालिका खेळवली गेली तर त्याला नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल. भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटप्रेमींना वंचित ठेवू नये म्हणून पाकिस्तान इंडियाने खेळावे आणि नियमितपणे खेळायला हवे, असे मला वाटते."
दरम्यान, जानेवारी 2013 पासून भारत-पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय क्रिकेट मालिका खेळली गेली नाही. अखेरीस पाकिस्तानने 2 टी-20 आणि 3 वनडे सामन्यांसाठी भारताचा दौरा केला होता. 2007-08 हंगामापासून दोन्ही संघ द्विपक्षीय कसोटी मालिकेत भेटले नाहीत. दोन्ही टीम अखेरीस आयसीसी 2019 वर्ल्ड कप सामन्यात आमने-सामने आले होते, ज्यात भारताने पाकिस्तानी टीमचा धुव्वा उडवला होता.