टीम इंडियाचा माजी कर्णधार Virat Kohli बाबत धक्कादायक खुलासा, 100 व्या कसोटीसाठी BCCI ने दिलेली ही खास ऑफर फेटाळली
आता त्याला बीसीसीआयने बेंगलोरमध्ये एका निरोप सामना खेळण्याची ऑफर दिल्याचे वृत्त समोर आहे. पण कोहलीने बोर्डाची ही ऑफर फेटाळून लावली. टीम इंडिया 25 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेविरुद्ध 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे आणि ही कोहलीची 100वी कसोटी असेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) केपटाऊन कसोटी सामन्यासह मालिका गमावल्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी कर्णधार पदाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. विराट भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार असून त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) सर्वाधिक 40 कसोटी सामने जिंकले आहेत. एमएस धोनीने 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यानंतर कोहलीला संघाची कमान देण्यात आली होती. त्याने संघाला सातव्या क्रमांकावरून कसोटीत पहिल्या क्रमांकावर नेले. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 5 वर्षे कसोटीतील सर्वोत्तम संघ बनला. इतके यश मिळवूनही कोहलीने अचानक निवृत्ती घेऊन सर्वांना चकित केले. आता अधिकृतपणे कसोटी कर्णधारपद सोडण्यापूर्वी कोहलीला बीसीसीआयने (BCCI) फेअरवेल मॅचची ऑफर केली होती असेही वृत्त समोर येत आहे. (Virat Kohli Test Captaincy Successor: नवीन टेस्ट कर्णधारासाठी सुनील गावस्करांनी सुचवले Rishabh Pant चे नाव, ‘या’ महान भारतीय खेळाडूचे उदाहरण दिले)
इंग्रजी वृत्तपत्र हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीनुसार, “जेव्हा विराट कोहलीने बीसीसीआयला फोनवर कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाची माहिती दिली. त्यानंतर बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडून त्याला बेंगलोरमध्ये एका समारंभात निरोप देण्याची ऑफर मिळाली. प्रत्युत्तरात कोहली म्हणाला, एका सामन्याने काही फरक पडत नाही. मी तसा नाहीये.” असे म्हणून विराटने बोर्डाच्या अधिकाऱ्याने दिलेली ऑफर नाकारली. लक्षात घ्यायचे म्हणजे 33 वर्षीय विराट बेंगलोरमध्ये श्रीलंकेविरुद्ध 100 वी कसोटी खेळू शकतो. श्रीलंकन संघ फेब्रुवारीमध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. दोन्ही देशांदरम्यान 2 कसोटी आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. पहिला कसोटी सामना 25 फेब्रुवारीपासून बेंगळुरू येथे खेळवला जाणार आहे. विराट या कसोटीत खेळला तर त्याची ही 100 वी कसोटी असेल. दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग येथे कोहलीला दुखापत झाली नसती, तर कर्णधार म्हणून त्याने हे स्थान गाठले असते.
विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने गेल्या वर्षी पहिल्या ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता जिथे त्यांना न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. याशिवाय कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने देशात आणि परदेशात यशाचे झेंडे फडकवले. उल्लेखनीय म्हणजे विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावली नाही. कर्णधार म्हणून विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने एकूण 68 कसोटी सामने खेळले, ज्यापैकी टीम इंडियाने 40 सामने जिंकले. तसेच संघाला फक्त 17 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला तर 11 सामानाने अनिर्णित राहिले.