Virat Kohli Birthday Special: विराट कोहलीच्या जर्सी नंबर 18 मागे काय आहे रहस्य? अतिशय भावनिक आहे कारण

2008मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकलेल्या विराटचा जर्सी नंबर 18 का आहे, हे तुम्हाला माहित आहे का? विराट अतिशय भावनिक कारणास्तव आपल्या 18 नंबर जर्सीशी जोडलेला आहे. आणि हा नंबर निवडण्याचे त्यांचे कारण देखील भावनिक आहे.

(Photo Credit: File Image)

Virat Kohli Jersey No 18: भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि क्रिकेट विश्वाचा सर्वात तेजस्वी स्टार विराट कोहलीचे (Virat Kohli) जगभरात अनेक चाहते आहेत. 'रन-मशीन', 'किंग कोहली' अशा नावांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रसिद्ध असलेल्या विराटचा आज 32 वा वाढदिवस आहे. क्रिकेट विश्वातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंपैकी एक विराटबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच उत्साहित असतात. 2008मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकलेल्या विराटच्या जिवावर आज अनेक विक्रमांची नोंद आहे. पण, विराटचा जर्सी नंबर (Virat Kohli Jersey No) 18 का आहे, हे तुम्हाला माहित आहे का? क्रिकेटपटूंना अनेकदा त्यांचे चाहते नावाने कमी तर त्यांच्या जर्सी नंबरने ओळखतात. प्रत्येक क्रिकेटपटूच्या जर्सी नंबरमागे एक कारण, एक भावना असते. विराटच्या जर्सी नंबर मागे देखील अशीच एक कहाणी आहे. विराट अतिशय भावनिक कारणास्तव आपल्या 18 नंबर जर्सीशी जोडलेला आहे. आणि हा नंबर निवडण्याचे त्यांचे कारण देखील भावनिक आहे. (Happy Birthday Virat Kohli: विराट कोहलीचे ‘ते’ 5 डाव ज्याने टीम इंडियाच्या ‘रन-मशीन’ला बनवले ‘किंग कोहली’)

कोहली आपले वडील प्रेम कोहली यांच्या अगदी जवळचा होता. त्यांच्या मृत्यूच्या दिवशी कर्नाटक विरुद्ध रणजी करंडक सामन्यात दिल्लीकडून खेळत होता. आणि तो दिवस 18 डिसेंबर, 2006 होता. विराट आपल्या वडिलांवर खूप प्रेम करायचा आणि त्याच्या वडिलांची विराटने भारतीय संघासाठी खेळावे अशी इच्छा होती म्हणून विराटने स्वत:साठी हा नंबर निवडला. विराटने 18 नंबरची जर्सी अंडर-19 क्रिकेट दरम्यान परिधान केली, आणि त्यानंतर टीम इंडिया आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी देखील तो याच क्रमांकाची जर्सी परिधान करतो.

दरम्यान, विराटने अनेकदा असे सांगितले आहे की त्याचे वडील प्रेमनाथ कोहली यांनीच त्याला खेळ खेळण्यास प्रोत्साहित केले आणि दिल्ली येथील क्रिकेट अकादमीमध्ये दाखल केले. आपल्या मुलाने भारताची निळ्या रंगाची जर्सी परिधान केलेले पाहणे हे विराटच्या वडिलांचे स्वप्न होते, पण दुर्दैवाने, विराटने भारतमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. आज विराटचे वडील आपल्या मुलाला पाहण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी आपल्या लाडकल्या लेकाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या शिखरावर पोहचलेले पाहून त्याच्या वडिलांना नक्कीच आनंद झाला असेल.