U19 World Cup: कसोटी क्रिकेटच्या ‘या’ दिग्गज फलंदाजाने विश्वचषकात रोहित शर्मापेक्षा केला आहेत जास्त धावा, नाव जाणून डोळे चक्रावतील!
त्याने 6 डावात 116 च्या सरासरीने आणि 82 च्या स्ट्राइक रेटने 349 धावा केल्या होत्या.
U19 World Cup: वेस्ट इंडिज (West Indies) येथे खेळला जाणारा अंडर-19 विश्वचषक (Under 19 World Cup) आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. इंग्लंड आणि भारताच्या युवा संघात आता जेतेपदाचा अंतिम सामना रंगणार आहे. संघाने सलग चौथ्यांदा आणि एकूण 8व्यांदा विजेतेपदाच्या फेरीत प्रवेश केला आहे. बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाचा 96 धावांनी पराभव केला. भारत अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचा सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने आतापर्यंत चार वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले असून यश धुलच्या (Yash Dhull) नेतृत्वात ‘यंगिस्तान’चे लक्ष आता विजयाच्या पंचकावर असेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघाला अनेक मोठे खेळाडू या स्पर्धेतूनच मिळाले आहे. युवराज सिंह, मोहम्मद कैफ, विराट कोहली, आणि रवींद्र जडेजा यांच्यासारखे टीम इंडियाचे (Team India) स्टार खेळाडूंनी अंडर-19 स्पर्धा गाजवली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे दोघे अंडर-19 विश्वचषक एकत्र खेळले होते. इतकंच नाही तर पुजारा सलामीला उतरला होता तर रोहित मधल्या फळीत खेळला होता. (U19 World Cup 2022: ‘बेबी एबी’ Dewald Brevis ने अंडर-19 विश्वचषकात घडवला इतिहास, शिखर धवनचा रेकॉर्ड मोडून पाडला धावांचा पाऊस)
पुजारा आणि रोहित 2006 मध्ये श्रीलंकेत झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळले होते. या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात टीम इंडिया यशस्वी ठरली होती, पण जेतेपदाच्या सामन्यात त्यांना पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. पुजारा संपूर्ण स्पर्धेत भारतासाठी सलामीला उतरला. याशिवाय तो संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही होता. त्याने 6 डावात 116 च्या सरासरीने 349 धावा केल्या होत्या. यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 82 होता. दुसरीकडे, या स्पर्धेत विद्यमान वरिष्ठ वनडे आणि टी-20 संघाचा कर्णधार रोहित शर्मा मधल्या फळीत खेळला. त्याने 6 सामन्यात 41 च्या सरासरीने 205 धावा केल्या आणि तीन अर्धशतकेही ठोकली. म्हणून तो स्पर्धेतून धावांच्या बाबतीत पुजाराच्या मागे होता. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुजारा भारतासाठी सर्वाधिक यशस्वी ठरला नाही तर रोहितने विक्रमी तीन द्विशतक झळकावले. उल्लेखनीय म्हणजे रोहितने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात देखील मधल्या फळीत केली असून तो 2013 पासून सलामीवीर म्हणून खेळत आहे.
दुसरीकडे, पुजाराबद्दल बोलायचे तर तो आज एक कसोटी क्रिकेटचा एक दिग्गज फलंदाज म्हणून ओळखला जातो. पुजाराला 2013 ते 2014 दरम्यान भारताकडून 5 एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली. ज्यामध्ये तो 10 च्या सरासरीने केवळ 51 धावाच करू शकला. 27 धावा ही सर्वोच्च धावसंख्या होती. यामुळे पुजारा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फारसे काही करू शकला नाही आणि पुढे कसोटी विशेषज्ञ बनला. त्याने भारतासाठी 95 कसोटी सामने खेळले असून 6700 हून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 18 शतके आणि 32 अर्धशतके केली आहेत.