U19 World Cup 2022: हरनूर सिंहची 88 धावांची शानदार खेळी, युवा टीम इंडियाची आयर्लंडवर 174 धावांनी मात; उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक
प्रथम फलंदाजी करताना भारतीय अंडर-19 संघाने 308 धावांची आव्हानात्मक धावसंख्या गाठली. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ 133 धावांवर ढेर झाला. टीम इंडियाच्या अंगक्रिश रघुवंशी आणि हरनूर सिंह यांनी शानदार खेळी केली.
U19 World Cup 2022: अंडर-19 क्रिकेट विश्वचषक (U19 CWC) 2022 च्या ब गटातील सामन्यात भारताने (India) आयर्लंडचा (Ireland) 174 धावांनी धुव्वा उडवला आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय अंडर-19 संघाने (India U19 Team) 308 धावांची आव्हानात्मक धावसंख्या गाठली. प्रत्युत्तरात आयर्लंडचा संघ 133 धावांवर ढेर झाला. टीम इंडियाच्या अंगक्रिश रघुवंशी (Angkrish Raghuvanshi) आणि हरनूर सिंह (Harnoor Singh) यांनी शानदार खेळी केली. तर गरव सांगवान, अनिश्वर गौतम आणि कौशल तांबे यांनी 2-2 गडी बाद केले. आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान भारतासाठी आंगक्रिश आणि हरनूर सलामीला आले. आंगक्रिशने 79 चेंडूंत 10 चौकार आणि 2 षटकारांसह 79 धावा तर हरनूरने 101 चेंडूत 88 धावा चोपल्या. तसेच राज बावाने 42 धावा (64 चेंडूत दोन चौकार आणि एक षटकार) आणि प्रभारी कर्णधार निशांत सिंधूने 34 चेंडूत पाच चौकारांसह 36 धावांचे योगदान दिले. (U19 World Cup 2022: भारतीय अंडर-19 संघात कोरोनाची एन्ट्री; कर्णधार यश धुल समवेत पाच खेळाडू COVID-19 पॉझिटिव्ह, BCCI अधिकाऱ्याची माहिती)
भारताच्या डावात शेवटी राजवर्धन हंगरगेकरने कमाल केली 17 चेंडूंत पाच षटकार आणि एका चौकारासह नाबाद 39 धावांची खेळी करत भारतीय संघाला 300 धावांचा टप्पा पार करून दिला. प्रत्युत्तरात मैदानात उतरलेल्या आयर्लंडच्या संघाला 10 धावांवर दोन धक्के बसले आणि त्यानंतरही विकेट पडण्याचे सत्र सुरूच राहिले. मधल्या फळीत स्कॉट मॅकबेथने 32 धावांची इनिंग खेळून झुंज दिली, पण याखेरीज दुसरा कोणताही फलंदाज खेळपट्टीवर तळ ठोकून खेळू शकला नाही. भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केल्याने आयर्लंडने 39 षटकांत 133 धावा करून 174 धावांनी विजय मिळवला. भारताकडून आठ खेळाडूंनी गोलंदाजी केली. यामध्ये कौशल, अनिश्वर आणि गर्व यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर राजवर्धन, रवी आणि विकीने 1-1 गडी बाद केला.
या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला, जेव्हा टीममधील 6 खेळाडूंना कोरोनाची सकारात्मक लागण झाली आणि त्यांना या सामन्यातून बाहेर करावे लागले. सुदैवाने भारताकडे 11 खेळाडू उपलब्ध होते. संक्रमित खेळाडूंमध्ये कर्णधार यश धुलचाही समावेश होता. मात्र, असे असतानाही भारतीय संघाने आयर्लंडविरुद्ध दमदार कामगिरी करत विश्वचषकात सलग दुसरा विजय नोंदवला. यापूर्वी भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला सामना 45 धावांनी जिंकला होता. सलग दोन सामन्यात विजयाने युवा टीम इंडिया क्वार्टर-फायनल फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला.