T20 क्रिकेटमध्ये ‘या’ भारतीय फलंदाजाचा यूएईमध्ये आहे जबरदस्त रेकॉर्ड, पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियासाठी ठरू शकतो ‘ट्रम्प कार्ड’

सलामीवीर केएल राहुल गेल्या काही सामन्यांमध्ये यूएईमध्ये सातत्याने फलंदाजी करत आहे. युएईमध्ये राहुलच्या फलंदाजीच्या विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर ते जबरदस्त आहेत.

विराट कोहली आणि केएल राहुल (Photo Credit: PTI)

टीम इंडियाने (Team India) इंग्लंडला त्यांच्या पहिल्या सराव सामन्यात ज्या प्रकारे पराभूत केले ते पाहता असे वाटते की भारतीय खेळाडू चांगल्या लयीत आहेत आणि संघाची तयारी योग्य दिशेने सुरु आहे. इंग्लंड (England) विरुद्ध टीम इंडियाच्या फलंदाजांची कामगिरी उत्कृष्ट होती, तर गोलंदाजीत काही कमतरता समोर आल्या. भुवनेश्वर कुमार लयीत दिसला नाही आणि त्याने खूप धावा लुटल्या. त्यानंतर युवा फिरकीपटू राहुल चाहर देखील प्रभावित होऊ शकला नाही. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने त्यांची जबाबदारी देखील चोख बजावली. याशिवाय फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने स्वतःला सिद्ध केले आणि त्याला विकेट मिळाल्या नसल्या तरी त्याने खूप कमी धावा दिल्या. म्हणजेच, भारतीय संघाला योग्य गोलंदाजांसह मैदानावर साखळी सामन्यांमध्ये उतरणे आवश्यक आहे. (T20 World Cup 2021 मध्ये भारतासाठी ‘हे’ 3 खेळाडू ठरणार ‘गेम चेंजर्स’, पाकिस्तान विरोधात करणार धमाल)

इंग्लंडविरुद्ध सामन्यात सलामीवीर फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) आणि केएल राहुल (KL Rahul) यांनी शानदार फलंदाजी प्रदर्शन केले. ईशान गेल्या काही सामन्यांमध्ये यूएईमध्ये (UAE)  सातत्याने फलंदाजी करत असताना राहुलची दमदार कामगिरी सुरूच आहे. आयपीएल  (IPL)2021 मध्ये राहुलने तिसऱ्या सर्वाधिक धावा केल्या आणि सराव सामन्यातही अर्धशतक झळकावून त्याने आपला फॉर्म सुरू ठेवला आहे. तसेच राहुलचा यूएईमध्ये खूप मजबूत फलंदाजीचा विक्रम आहे आणि या विश्वचषकात तो विरोधी संघांसाठी मोठा धोका सिद्ध होऊ षट्को. राहुल ज्या फॉर्ममध्ये आहे, त्याने त्याचा फायदा घ्यावा आणि भरपूर धावा कराव्यात जेणेकरून नंतरच्या फलंदाजांवर कोणतेही दडपण येणार नाही आणि ते मुक्तपणे खेळू शकतील व भारत स्कोअर बोर्डवर अधिकाधिक धावसंख्या उभारू शकतो.

युएईमध्ये राहुलच्या फलंदाजीच्या विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर ते जबरदस्त आहेत. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत यूएईमध्ये आतापर्यंत एकूण 25 टी-20 सामने खेळले आणि 24 डावांमध्ये 1083 धावा केल्या आहेत. यूएईमध्ये त्याची सरासरी 51.57 आहे आणि 129.23 स्ट्राईक रेट आहे. राहुलची यूएईमध्ये टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 132 धावा आहे आणि त्याने 25 सामन्यांत एक शतक व सात अर्धशतके केली आहेत. या सामन्यांमध्ये राहुलने 85 चौकार आणि 40 षटकार खेचले आहेत. उल्लेखनीय आहे की, भारताला पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध 24 ऑक्टोबर रोजी पहिला साखळी सामना खेळायचा आहे आणि राहुलचा फॉर्म कट्टर प्रतिस्पर्धीसाठी मोठा धोका बनू शकतो.