T20 चा ‘किंग’ तबरेज शम्सीचा आणखी एक पराक्रम, श्रीलंकेविरुद्ध सामन्यात बनवला मोठा विश्वविक्रम; ‘हा’ स्टार लंकन फिरकीपटू करतोय पाठलाग

शम्सीने शनिवारी शानदार गोलंदाजी केली आणि चार षटकांच्या स्पेलमध्ये त्याने 17 धावांत तीन विकेट घेतल्या. या तीन विकेट्ससह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) शनिवारी आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकच्या (ICC Men's T20 World Cup) सुपर 12 टप्प्यातील गट 1 सामन्यात श्रीलंकेचा (Sri Lanka) संघ निर्धारित 20 षटकांत 142 धावांवर ढेर झाला. श्रीलंकन संघाला छोट्या धावसंख्येवर रोखण्यात दक्षिण आफ्रिकेच्या तबरेज शम्सीने (Tabraiz Shamsi) महत्त्वाची भूमिका बजावली. शम्सीने शनिवारी शानदार गोलंदाजी केली आणि चार षटकांच्या स्पेलमध्ये त्याने 17 धावांत तीन विकेट घेतल्या. त्याने भानुका राजपक्षे (0), अविष्का फर्नांडो (3) आणि वानिंदू हसरंगा (4) यांना पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. या तीन विकेट्ससह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. श्रीलंकेविरुद्ध या तीन विकेट्समुळे यंदाच्या टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये शम्सीच्या विकेट्सची संख्या 32 वर पोहोचली आहे. (SA vs SL, T20 World Cup 2021: श्रीलंकेला 4 विकेटने लोळवून दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी, Wanindu Hasaranga ची हॅटट्रिक व्यर्थ)

T20 फॉरमॅटमध्ये तो एका वर्षात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याने आतापर्यंत 2021 मध्ये 32 विकेट्स घेतल्या आहेत आणि तो T20I क्रमवारीत जगातील नंबर 1 गोलंदाज देखील आहे. 2021 मध्ये सर्वाधिक टी-20I विकेट्सच्या यादीत, शम्सी आणि श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) हे एकमेव गोलंदाज आहेत जे 2021 आयसीसी टी-20 विश्वचषक खेळत आहेत आणि त्यांच्या नावावर 30 पेक्षा जास्त विकेट आहेत. श्रीलंकेच्या वानिंदू हसरंगाने यावर्षी 31 विकेट घेतल्या आहेत आणि शम्सीच्या या विक्रमी रेकॉर्डचा पाठलाग करत आहे. तसेच बांगलादेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिझूर रहमानने 2021 मध्ये 26 विकेट घेतल्या आहेत. 31 वर्षीय गोलंदाजाने भानुका राजपक्षे, अविष्का फर्नांडो आणि वानिंदू हसारंग यांना मधल्या षटकांमध्ये बाद केले. या वर्षीच्या स्पर्धेत या तिघांनी 2014 च्या चॅम्पियन्ससाठी प्रभावी कामगिरी केली आहे.

2017 मध्ये पदार्पण केल्यानंतर शम्सीने दक्षिण आफ्रिकेसाठी 45 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत आणि या वर्षाच्या सुरुवातीला पाकिस्तानविरुद्ध 4/25 च्या सर्वोत्तम आकड्यांसह त्याने 21 च्या सरासरीने एकूण 53 विकेट्स घेतल्या आहेत. शम्सीच्या एकूण टी-20 कामगिरीवर नजर टाकली तर त्याने 170 सामन्यांत 191 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये तो यंदा राजस्थान रॉयल्सकडून खेळताना दिसला होता. सध्या तो आंतरराष्ट्रीय टी-20 चा नंबर 1 गोलंदाज देखील आहे.