T20 World Cup 2021: विश्वचषकात ‘शानदार शनिवारी’मध्ये चार संघात रंगणार चुरशीची लढत, एकाच दिवशी मिळणार आणखी दोन Semifinalist संघ

आता स्पर्धेला आणखी एक सेमीफायनलिस्ट संघ मिळणार आहेत. विश्वचषकच्या सुपर-12 फेरीत चार संघ आपला अंतिम सामना खेळण्यासाठी शनिवारी मैदानात उतरणार आहेत. म्हणजेच क्रिकेट चाहत्यांसाठी शनिवार आणखी ‘शानदार’ ठरणार हे नक्की आहे.

टी-20 वर्ल्ड कप (Photo Credit: Getty Images)

आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 चा थरार प्रत्येक सामन्यासह वाढत जात आहे. स्पर्धेचा शेतट जसजसा जवळ येत आहे तसतसा सामन्यांचा रोमांच वाढत जात आहे. सुपर-12 मध्ये आता फक्त मोजके सामने शिल्लक असताना बाबर आजमचा पाकिस्तान (Pakistan) संघाने सर्वप्रथम सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. आपल्या जबरदस्त खेळाच्या जोरावर पाकिस्तान गट 2 मध्ये सर्व चार सामने जिंकून अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. आता स्पर्धेला आणखी एक सेमीफायनलिस्ट संघ मिळणार आहेत. विश्वचषकच्या सुपर-12 फेरीत चार संघ आपला अंतिम सामना खेळण्यासाठी शनिवारी मैदानात उतरणार आहेत. म्हणजेच क्रिकेट चाहत्यांसाठी शनिवार आणखी ‘शानदार’ ठरणार हे नक्की आहे. पाकिस्तान उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ बनला असून त्याच्या सोबत आणखी कोणते संघ सामील होतात याकडे प्रत्येक क्रिकेट प्रेमीचे लक्ष लागून राहिले आहे. (T20 World Cup 2021: चॅम्पियन संघासह ‘हे’ 4 संघ टी-20 विश्वचषकातून बाहेर होते, फक्त ‘या’ एका संघाने सेमीफायनलचे तिकीट पक्के केले)

विश्वचषकच्या अंतिम ‘शानदार शनिवार’मध्ये म्हणजे उद्या दोन सामने खेळले जातील. यातील पहिल्या सामन्यात आरोन फिंचचा ऑस्ट्रेलिया (Australia) संघ अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर गतविजेता वेस्ट इंडिजशी (West Indies) भिडेल. करोन पोलार्डचा विंडीज संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे तर कांगारू संघ सेमीफायनलच्या उंबरठ्यावर उभा आहे. गेल्या शनिवारी कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने गुरुवारी बांगलादेशवर विक्रमी आठ गडी राखून पुनरागमन केले आणि त्यांचा नेट रनरेट -0.627 वरून +1.031 वर पोहोचला आहे. दुसरीकडे, संध्याकाळच्या सामन्यात मोठ्या लयीत असलेल्या विश्वविजेता इंग्लंडचा  (England) सामना दक्षिण आफ्रिकेशी (South Africa) होईल. इयन मॉर्गनच्या इंग्लिश संघाने त्यांचे सर्व चार सामने जिंकले आहेत आणि +3.183 च्या नेट रनरेटच्या जोरावर त्यांचा उपांत्य फेरीत प्रवेश जवळपास निश्चित आहे.

याशिवाय चार सामन्यांत सहा गुणांसह दक्षिण आफ्रिका गटात तिसऱ्या स्थानावर आहे. या गटातून इंग्लंडशिवाय दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघाला उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट दक्षिण आफ्रिकेपेक्षा चांगला आहे पण दक्षिण आफ्रिकेसाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांचा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यानंतर आहे. अशा स्थितीत आफ्रिकन संघाला अंतिम चारमध्ये स्थान निश्चित करण्यासाठी काय करावे लागेल याचे चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे ‘शानदार शनिवार’च्या दोन सामन्यानंतर पाकिस्तानसोबत सेमीफायनलमध्ये आणखी दोन टीम सामील होतील.