T20 World Cup 2021: पाकिस्तानचा ‘मॅच-विनर’ Asif Ali याच्या ‘बंदूक’ सेलिब्रेशनवर अफगाणिस्तानचे राजदूत संतप्त, अशा शब्दात केली निंदा

आसिफ अलीने मोक्याच्या क्षणी बॅटने आपली कमाल दाखवली आणि सामना पाकिस्तानच्या खिशात घातला. अफगाणिस्तानचे श्रीलंकेतील राजदूत एम. अश्रफ हैदरी आसिफवर संतापले आहेत. असिफने सामन्याच्या शेवटी आपली बॅट बंदुकीसारखी धरली. हीच गोष्ट हैदरी यांना आवडली नाही.

आसिफ अली (Photo Credit: Twitter/MHafeez22)

पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) शुक्रवारी आयसीसी टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2021 मध्ये मोठ्या उलटफेरचा बळी पडण्यापासून बचावला. अफगाणिस्तान (Afghanistan) संघाने त्याला पराभूत केले असते पण आसिफ अलीने (Asif Ali) मोक्याच्या क्षणी बॅटने आपली कमाल दाखवली आणि सामना पाकिस्तानच्या (Pakistan) खिशात घातला. आसिफने एकाच षटकात चार षटकार मारत संघाला एक ओव्हरपूर्वी विजय मिळवून दिला आणि आपल्या संघाला पराभवाच्या निराशेपासून वाचवले. तेव्हापासून आसिफ चर्चेत आला आहे. सर्वजण त्याचे कौतुक करत आहेत. क्रिकेटपंडितही आसिफवर फिदा झाले आहेत. मात्र यादरम्यान एक व्यक्ती आसिफवर संतापली आहे. आणि ही व्यक्ती आहे अफगाणिस्तानचे श्रीलंकेतील राजदूत एम. अश्रफ हैदरी. असिफने सामन्याच्या शेवटी आपली बॅट बंदुकीसारखी धरली. हीच गोष्ट हैदरी यांना आवडली नाही आणि त्यांनी शनिवारी ट्विटरवरून आसिफवर टीका केली. (T20 World Cup, PAK vs AFG: अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पाकिस्तानने घातला खिशात, आसिफ अलीने 4 षटकार ठोकत केली विजयाची हॅट्रीक)

त्यांनी लिहिले की, “पाकिस्तानच्या मुख्य खेळाडूने अफगाणिस्तानच्या खेळाडूंना बंदूक दाखवणे हे आक्रमकतेचे लज्जास्पद कृत्य आहे. अफगाणिस्तान खेळाडूंनी त्याला आणि त्याच्या संघाला कडवे आव्हान दिले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेळ हा निरोगी स्पर्धा, मैत्री आणि शांतता यासाठी आहे.” हैदरीच्या या ट्विटपूर्वीच आसिफचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत होता. आसिफ अलीचे हे बंदुक सेलिब्रेशन पाहून यूजर्सना एमएस धोनीचे जुने रूप आठवले. 2005 मध्ये जयपूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावून धोनीने त्याच पद्धतीने शतक साजरे केले होते. अनेक ट्विटर युजर्सनी धोनी आणि आसिफचे एकत्र फोटो ट्विट केले आहेत. दरम्यान, अफगाणिस्तान राजदूताच्या ट्विटशिवाय इतरही काही यूजर्सने देखील आसिफवर टीका केली पण अनेकांनी त्याचे समर्थनही केले.

असिफ अली व एमएस धोनीची अ‍ॅक्शन

लक्षात घ्यायचे की UAE आणि ओमानमध्ये खेळल्या जात असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने सलग तीन सामन्यांमध्ये लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला आहे. बाबर आजमच्या पाकिस्तान संघाने शुक्रवारी अफगाणिस्तानचा पाच विकेट्सने पराभव केला आणि उपांत्य फेरी गाठण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले. संघाच्या या विजयात सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आसिफ अलीचा मोलाचा वाटा होता.