ICC Meeting: टी-20 वर्ल्ड कपबाबत आज अंतिम 'फैसला'? आयसीसीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मोठ्या निर्णयाची शक्यता

शिवाय, बीसीसीआय क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आग्रहाखातर 2021 ऐवजी 22 ला वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी सहमत होईल की नाही हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.

आयसीसी टी -20 वर्ल्ड कप 2020 ट्रॉफी  (Photo Credits: Getty Images)

ऑस्ट्रेलियामध्ये यंदा ऑक्टोबरमध्ये टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) आयोजनाबाबत आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवाय, बीसीसीआय (BCCI) क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (Australia) आग्रहाखातर 2021 ऐवजी 22 ला वर्ल्ड कपच्या आयोजनासाठी सहमत होईल की नाही हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे. आज होणाऱ्या बैठकीत वर्ल्ड कप आयोजनाबरोबरच आयसीसीच्या अध्यक्षपदाच्या निवडप्रक्रियेसाठी नामांकन प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा देखील केली जाऊ शकते. आयसीसीच्या कार्यकारी मंडळाची ही बहुचर्चित बैठक टेलिकॉन्फरन्सद्वारे होणार आहे. करोनामुळे ऑस्ट्रेलियात 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान खेळला जाणारा वर्ल्ड कप पुढे ढकलण्यात येण्याचीच शक्यता सर्वाधिक असून स्पर्धा लांबणीवर पडल्यास इंडियन प्रीमियर लीग (IPL) होण्याची शक्यता बळावली आहे. (New ICC Rules: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये होणार मोठे बदल; महत्वाच्या 'या' 4 नियमांना मंजूरी)

दुसरीकडे, शशांक मनोहर यांचा आयसीसी कार्याध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आल्याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, याकडेही क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे. आयसीसीच्या बैठकीत निवडप्रक्रियेबरोबरच करोनामुळे झालेले आर्थिक नुकसान आणि त्यावरील उपाय यासंबंधीही गांभीर्याने चर्चा करण्यात येणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हिन रॉबर्ट्स यांनी वर्ल्ड कपचे आयोजन ठरलेल्या वेळापत्रकानुसार होणे अशक्य असल्याचे मत काही आठवड्यांपूर्वी व्यक्त केले होते. परंतु आयसीसीने मे महिन्याच्या अखेरीस होणारी बैठक 10 जूनपर्यंत स्थगित केली, त्यामुळे ऑलिम्पिक, विम्बल्डनसारख्या प्रतिष्ठित स्पर्धा रद्द अथवा पुढे ढकलण्यात आल्याने वर्ल्ड कप स्पर्धेविषयी बुधवारी तरी अंतिम निर्णय घेण्यात येणार का हे पाहणे रंजक ठरेल.

दरम्यान, आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीतही सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेबाबतही निर्णय लागला नाही. आशियाई क्रिकेट परिषदेच्या सदस्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत आशिया कप स्पर्धेसंबंधी चर्चा झाली, पण या चर्चेतून कोणताही अंतिम निर्णय घेता आला नाही. त्यामुळे आता याच महिन्यात काही दिवसांनी पुन्हा एकदा या संदर्भात बैठक घेण्यात येणार आहे. यंदा पाकिस्तान बोर्ड या स्पर्धेचे आयोजन करणार आहेत.