श्रीलंकन क्रिकेटने ‘या’ 3 खेळाडूंवरील बंदी उठवली, पण भरावा लागणार 1 कोटी श्रीलंकन रुपयांचा दंड
मात्र, बोर्डाने या तीन क्रिकेटपटूंना केवळ देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली आहे. इंग्लंड दौऱ्या वेळी बायो-बबलचे उल्लंघन केल्यामुळे SLC ने तीनही क्रिकेटपटूंवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून एक वर्षाची आणि देशांतर्गत क्रिकेटमधून सहा महिन्यांची बंदीची कारवाई केली होती.
श्रीलंका क्रिकेटने (Sri Lanka Cricket) कुसल मेंडिस (Kusal Mendis), दनुष्का गुणाथिलाका आणि निरोशन डिकवेला (Niroshan Dickwella) यांच्यावर लादलेली बंदी मागे घेतली आहे आणि आता हे तीन क्रिकेटपटू क्रिकेटमध्ये परतण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, बोर्डाने या तीन क्रिकेटपटूंना केवळ देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली आहे. SLC ने यंदा वर्षाच्या सुरुवातीला संघाच्या इंग्लंड दौऱ्या (England Tour) वेळी बायो-बबलचे उल्लंघन (Bio-Bubble Breach) केल्यामुळे तीनही क्रिकेटपटूंवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून एक वर्षाची आणि देशांतर्गत क्रिकेटमधून सहा महिन्यांची बंदीची कारवाई केली होती. SLC सचिव मोहन डी सिल्वा यांनी खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली जाईल याची पुष्टी केली आहे.
डेली मेलशी बोलताना डी सिल्वा म्हणाले की, “या तिन्ही क्रिकेटपटूंना त्यांच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी दिली जाईल जर त्यांनी दंड भरला.” बायो-बबल उल्लंघनाबद्दल बोर्डाने त्यांच्यावर एक कोटी श्रीलंकन रुपयांचा दंड ठोठावला होता. मोहन डी सिल्वा म्हणाले, “आम्ही मंत्रालयाला कळवू की आम्ही त्यांना दंड भरण्याच्या अटीवर क्रिकेट खेळण्याची परवानगी देऊ.” मेंडिस, दनुष्का गुणथिलाका आणि निरोशन डिकवेला यांच्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय मंगळवारी बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला. इंग्लंडमध्ये बायो-बबल उल्लंघन करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या तिन्ही क्रिकेटपटूंवर सर्व बाजूंनी टीका झाली. हे तीन क्रिकेटपटू आगामी टी-20 विश्वचषक 2021 मध्ये श्रीलंका संघाचा भाग नाहीत. सध्याच्या कोरोना महामारीच्या कठीण काळात कठोर बायो-बबलमध्ये क्रिकेट सर्वत्र खेळले जात आहे. या दरम्यान प्रोटोकॉलचे पालन केले गेले नाही, तर यामुळे संघ आणि संपूर्ण मालिका दोघांनाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
तथापि, श्रीलंकन विश्वचषक संघाबद्दलबोलायचे तर बोर्डाने यापूर्वी स्पर्धेसाठी 15 सदस्यीय मजबूत संघाची घोषणा केली होती. दासून शनाका संघाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहेत आणि धनंजय डी सिल्वा संघाचा उपकर्णधार आहे.