टीम इंडियाच्या फील्डिंग कोच पदासाठी क्रिकेटविश्वातील या दिग्गज खेळाडूने केला अर्ज

ऱ्होड्स यांनी दक्षिण आफ्रिका आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाला क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षण दिले आहे.

(Photo Credit: Getty Image)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकनंतर बीसीसीआय (BCCI) कडून भारतीय संघाच्या (Indian Team) मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि त्याच्या टीमचा करार वेस्ट इंडीज (West Indies) दौऱ्यापर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान, मुंबई मिररच्या एका रिपोर्टनुसार भारताच्या फिल्डिंग कोचसाठी जगातील दिग्गज क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा जॉन्टी ऱ्होडस (Jonty Rhodes) यांनी अर्ज केला आहे. ऱ्होड्स हे त्यांच्या काळातील जबरदस्त क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जातात. ऱ्होड्स यांना फील्डिंग प्रशिक्षणाचा अनुभव आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि आयपीएल (IPL) मध्ये मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षण दिले आहे. (हे 5 माजी खेळाडू घेऊ शतकात टीम इंडिया मध्ये मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांची जागा)

सध्या आर श्रीधर (R Sridhar) हे भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आहेत. त्यांचा कार्यकाळ 45 दिवसांनी वाढवण्यात आला आहे. आर श्रीधर वेस्ट इंडीज दौऱ्यावर भारतीय संघासोबत असणार आहेत. त्यानंतर बीसीसीआय प्रशिक्षकांची निवड करणार आहे. यंदा भारतीय संघाचा नवीन मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ कोण असेल याचा निर्णय भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील त्रिसदस्यीय सल्लागार समिती घेणार आहे.

आयसीसी क्रिकेट विश्वचषकनंतर बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, स्ट्रेंथ अॅण्ड कंडीशनिंग कोच, प्रशासकिय व्यवस्थापक या पदांसाठी अर्ज मागवले आहे. यासाठी इच्छूक उमेदवार 30 जुलैपर्यंत अर्ज करू शकतात. पण बीसीसीआयने यासाठी काही अटी निर्धारित केल्या आहेत. मुख्य प्रशिक्षकाकडे टेस्ट खेळणाऱ्या देशाला दोन वर्ष प्रशिक्षण दिल्याचा अनुभव असायला हवा किंवा असोसिएट सदस्य, ए टीम, आयपीएल टीम यापैकी एकाला कमीत कमी तीन वर्ष प्रशिक्षणाचा अनुभव असायला हवा. भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी महत्त्वाची अट म्हणजे त्याने किमान 30 आंतरराष्ट्रीय कसोटी किंवा 50 वनडे सामने खेळलेले असावे.