Sourav Ganguly On Being Dropped: 'फक्त ग्रेग चॅपेलला दोष देऊ शकत नाही', 15 वर्षानंतर सौरव गांगुली यांनी भारतीय संघातून वगळण्याबाबत केला धक्कादायक खुलासा
गांगुली म्हणाले की, त्याच्या कारकीर्दीतील सर्वात मोठा धक्का म्हणजे जेव्हा त्याला भारतीय संघाच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले. गांगुली म्हणाले की त्याला संघातून काढून टाकण्यात केवळ माजी प्रशिक्षक चॅपेलच नव्हे तर संपूर्ण यंत्रणाच सामील आहे.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) उल्लेखनीय आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचा आनंद लुटला. गांगुली हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात नामांकित वनडे कर्णधारांपैकी एक आहे. परंतु टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल (Greg Chappell) यांच्याबरोबरच्या वादामुळे त्याच्या कारकीर्दीचे अक्षरश: पडसाद उमटले. गांगुलीने 15 वर्षांआधी 2005 मध्ये तत्कालीन कोच ग्रेग चॅपेल यांच्यासोबत झालेल्या वादाबाबत एक खुलासा केला आहे. गांगुली म्हणाले की, त्याच्या कारकीर्दीतील सर्वात मोठा धक्का म्हणजे जेव्हा त्याला भारतीय संघाच्या (Indian Team) कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आणि त्यानंतर 2005 मध्ये भारतीय संघातून वगळले गेले. गांगुली म्हणाले की त्याला संघातून काढून टाकण्यात केवळ माजी प्रशिक्षक चॅपेलच नव्हे तर संपूर्ण यंत्रणाच सामील आहे. त्याच्याकडून कर्णधारपद हिसकावणे हे अन्यायकारक आहे असे गांगुलीचे मत आहे. (सध्याच्या भारतीय टीममधील 'या' 5 खेळाडूंची सौरव गांगुलीने त्याच्या टेस्ट संघात केली निवड, मयंक अग्रवालसोबत मुलाखतीत केला खुलासा)
'प्रतिदिन' या बंगाली वृत्तपत्राबादला दिलेल्या मुलाखतीत गांगुलीने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात कठीण काळाबद्दल सांगितले. तो म्हणाला, “माझ्या कारकिर्दीचा हा सर्वात मोठा धक्का होता. माझ्यासोबत अन्याय झाला. मला माहित आहे की आपल्याला नेहमीच न्याय मिळू शकत नाही, परंतु माझ्याबरोबर जे घडले ते माझ्या बाबतीत घडायला नको हवे होते. मी टीम इंडियाचा कर्णधार होतो आणि झिम्बाब्वेविरुद्ध जिंकल्यानंतर परतलो आणि घरी परत येताच मला कर्णधारपदावरून काढण्यात आले. भारतासाठी 2007 विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न मी पाहिले होते. मागील वेळी आम्ही अंतिम सामन्यात पराभूत झालो होतो. गेली पाच वर्षे संघ माझ्या नेतृत्वात घरी आणि बाहेर इतका चांगला खेळला होता. मग तू मला अचानक काढून टाकता? पहिले तुम्ही मला सांगा की मी वनडे संघात नाही, नंतर तुम्ही मला कसोटी संघातूनही काढून टाकता.”
बुधवारी आपला 48 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या गांगुलीने मात्र एकट्याचॅपेलला दोषी ठरवण्यास नकार दिला आणि म्हटले की संपूर्ण यंत्रणेच्या पाठिंब्याशिवाय त्याला भारतीय कर्णधारपदावरून काढून टाकणे शक्य नाही. 2005 मध्ये भारतीय संघातून वगळल्यानंतर गांगुलीने दक्षिण आफ्रिका दौर्यासाठी 2006 मध्ये भारतीय संघात पुनरागमन केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतल्यानंतर गांगुलीने काही धावा केल्या आणि पुढील दोन वर्षांत त्याने काही उत्कृष्ट खेळी केल्या. 2008 नागपुरात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली. गांगुलीने 311 एकदिवसीय सामन्यांमध्ये 22 शतकांसह 11363 धावा केल्या. तर, 113 कसोटीत 42.17 च्या सरासरीने आणि 16 शतकांसह 7212 धावा केल्या.