Sachin Tendulkar Birthday Special: मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे अखेरपर्यंत या मैदानावर टेस्ट शतक करण्याचे स्वप्न राहिले अधुरे
क्रिकेटच्या दुनियेतील अनेक विक्रम सचिनने आपल्या नावावर केले आहे पण मास्टर-ब्लास्टर आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या अखेरपर्यंत ‘लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड’वर कसोटी शतकाची पाटी कोरीच राहिली.
Sachin Tendulkar Birthday Special: “क्रिकेटचा देव”, “मास्टर-ब्लास्टर” अशा अनेक नावाने प्रसिद्ध असलेला भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर (Sahin Tendulkar) आज आपला 48वा वाढदिवस साजरा करत आहे. 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सचिनने आपली निवृत्ती जाहीर केली आणि तो क्षण प्रत्येक क्रिकेट प्रेमीसाठी आजवरचा भावनिक क्षण ठरला. क्रिकेटच्या दुनियेतील अनेक विक्रम सचिनने आपल्या नावावर केले आहे पण एक असा रेकॉर्ड आहे जो मास्टर-ब्लास्टर आपल्या क्रिकेट कारकिर्दीच्या अखेरपर्यंत करू शकला नाही आणि तो म्हणजे क्रिकेटची पांढरी म्हटल्या जाणाऱ्या ‘लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड’वर (Lords Cricket Ground) कसोटी शतक आहे. लॉर्ड्स येथे कसोटी शतक झळकावणे प्रत्येक खेळाडूसाठी नेहमीच खास ठरले आहे. पण प्रत्येक खेळाडूला लॉर्डस् ऑनर्स बोर्डवर (Lords Honours Board) आपले नाव लिहून हा सन्मान मिळवता आलेला नाही आणि सचिन देखील याच खेळाडूंमध्ये सामील आहे. (IPL मध्ये विदेशी खेळाडूंचा बोलबाला, आतापर्यंत फक्त 2 भारतीयांनी जिंकला Most Valuable Player अवॉर्ड)
सचिनने कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय स्तरावर 51 कसोटी शतके ठोकली होती पण क्रिकेटच्या मक्का येथे त्याला एकही शंभरी पार करता आलेली नाही. 1989 मध्ये पदार्पणानंतर सचिन संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत 9 वेळा लंडनच्या या प्रसिद्ध मैदानावर उतरला आहे. सचिनने या मैदानावर 21.67 च्या सरासरीने 10, 27, 31, 16, 12, 37, 16, 34, 12 - एकूण 195 धावा केल्या आहेत जे तेंडुलकरच्या प्रतिष्ठेला योग्य न्याय देत नाही. मात्र, एक अशी गोष्ट आहे जी कदाचित अनेक चाहत्यांना माहित नसेल आणि ती म्हणजे लॉर्ड्समध्ये सचिनने शतक झळकावले आहे, जी त्याची संस्मरणीय खेळी ठरू शकते. 1998 मध्ये Marylebone क्रिकेट क्लब संघाविरुद्ध उर्वरित वर्ल्ड इलेव्हनकडून खेळताना सचिनने लॉर्ड्सवर 114 चेंडूत 125 धावांची धमाकेदार शतकी खेळी केली होती. इंग्लंडच्या प्रिन्सेस डायनाच्या आठवणीत या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. तेंडुलकरच्या संघाने डाव आणि 125 धावांनी सामना जिंकला होता.
दरम्यान, भारताकडून लॉर्ड्सच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी शतके करण्याचा विक्रम माजी दिग्गज फलंदाज दिलीप वेंगसरकर यांच्या नावावर आहे ज्यांनी सर्वाधिक 3 टेस्ट शतक झळकावले आहे. दुसरीकडे, सचिनने आपल्या 24 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये टेस्ट आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांची नोंद केली आहे. शिवाय, मास्टर-ब्लास्टर सर्वाधिक 200 कसोटी सामने खेळणारा एकमेव खेळाडू देखील आहे. सचिनने कसोटीमध्ये 51 तर वनडेमध्ये 49 शतकांची अशा एकूण विश्वविक्रमी 100 शतकांची नोंद केली आहे.