SA vs ENG 1st ODI: दक्षिण आफ्रिका क्रिकेटर COVID-19 पॉसिटीव्ह, इंग्लंडविरुद्ध पहिला वनडे सामना स्थगित
दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडू कोविड पॉसिटीव्ह असल्याचे आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी, खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या फेरीची कोरोना टेस्ट घेण्यात आली.
SA vs ENG 1st ODI: दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि इंग्लंड (England) संघातील पहिला वनडे सामना 6 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडू कोविड-19 (COVID-19) पॉसिटीव्ह असल्याचे आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी, खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या फेरीची कोरोना टेस्ट घेण्यात आली. यानंतर दोन्ही क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली आणि पहिला वनडे सामना आता रविवारी खेळण्याचा निर्णय घेण्यात आला. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना न्यूझीलंड, केप टाऊन येथे खेळला जाणार होता. 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेने इंग्लंडच्या दक्षिण आफ्रिकी दौऱ्याची सुरुवात झाली ज्यात यजमान संघाला क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका आयोजित केल्यावर इंग्लंड संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर पोहचला आहे. (SA vs ENG T20I: डेविड मलान-जोस बटलर यांची विक्रमी भागीदारी, इंग्लंडच्या 9 विकेट विजयाने दक्षिण आफ्रिकेचा सलग तिसरा पराभव)
“ठरलं: क्रिकेट दक्षिण आफ्रिका आणि ईसीबीने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना रविवारी, 06 डिसेंबर 2020 रोजी पर्यंत पुढे ढकलल्याची पुष्टी केली,” सीएसएने ट्विटमध्ये लिहिले. “दोन्ही संघ, सामन्याचे अधिकारी आणि सामन्यात सामील असलेल्या सर्वांच्या सुरक्षा आणि कल्याणाच्या हिताच्या दृष्टीने सीएसएचे कार्यवाहक मुख्य कार्यकारी अधिकारी, Kugandrie Govender तसेच ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन यांनी सामना रविवार पर्यंत स्थगित करण्यास सहमती दर्शवली आहे,” सीएसएने ट्विटच्या मालिकेत सांगितले.
दरम्यान, वनडे मालिकेपूर्वी देखील दक्षिण आफ्रिकी संघातील काही खेळाडू कोरोना पॉसिटीव्ह असल्याचे आढळून आले होते. 19 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकी खेळाडूला व्हायरसची सकारात्मक लागण झाली होती त्यानंतर दुसरा खेळाडूही कोरोना पॉसिटीव्ह असल्याचे वृत्त 21 नोव्हेंबर रोजी समोर आले होते. 27, 29 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर रोजी टी-20 मालिकेचे सामने खेळले गेले. दुसरीकडे, या घटनेनंतर उर्वरित दोन एकदिवसीय सामने अनुक्रमे 6 आणि 9 डिसेंबर रोजी पार्ल आणि केप टाउन येथे खेळले जाणार आहे.