IND vs SA T20 WC 2024 Final: रनमशीन अख्ख्या विश्वचषकात फेल, फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकाविरोधात विराट कोहलीची बॅट तळपणार का? भारतासाठी चिंतेचा विषय
टी-20 विश्वचषक 2024 च्या फायनलमध्ये विराट कोहलीकडून भारतीय चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. आतापर्यंत या स्पर्धेत विराटची बॅट शांत दिसत होती. ओपनिंग करताना किंग कोहली पूर्णपणे 'फ्लॉप' असल्याचे दिसून आले.
IND vs SA ICC T20 World Cup 2024 Final: टी-20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना (T20 World Cup 2024 Final) आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात होणार आहे. या सामन्यात केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे रात्री 8 वाजल्यापासून दोन्ही संघ आमनेसामने येतील. पण त्याआधी भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे विराट कोहलीचा (Virat Kohli) फॉर्म नसणे. टी-20 विश्वचषक 2024 च्या फायनलमध्ये विराट कोहलीकडून भारतीय चाहत्यांना खूप अपेक्षा आहेत. आतापर्यंत या स्पर्धेत विराटची बॅट शांत दिसत होती. ओपनिंग करताना किंग कोहली पूर्णपणे 'फ्लॉप' असल्याचे दिसून आले. आता केन्सिंग्टन ओव्हल, बार्बाडोस येथे खेळल्या जाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात कोहली मोठ्या धावा करतो की नाही हे पाहणे म्हत्वाचे असणार आहे.
कोहलीचा फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे
टी-20 विश्वचषक 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहलीचे नाव या यादीत फारसे दूर नाही. या विश्वचषकात कोहली पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे. त्याने आतापर्यंत सहा डावांत 11 च्या खराब सरासरीने केवळ 66 धावा केल्या आहेत. या काळात त्याचा स्ट्राइक रेटही केवळ 100 राहिला आहे. अफगाणिस्तानच्या रहमानउल्ला गुरबाजने 2024 च्या टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्या आहेत. गुरबाजने 8 डावात 35.12 च्या सरासरीने 281 धावा केल्या आहेत. या काळात त्याची सर्वोच्च धावसंख्या 80 होती.
किंग कोहली अंतिम फेरीत धावा करेल, अशी आशा सर्वांना
कोहलीची या स्पर्धेतील फ्लॉप कामगिरी असूनही, क्रिकेट चाहत्यांना आशा आहे की तो आज खूप धावा करेल आणि टीम इंडियाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान देईल. जागतिक क्रिकेटमधील दिग्गजांचाही असाच विश्वास आहे. इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसर म्हणतो की, टीम इंडिया आज नक्कीच जिंकेल. इतकंच नाही तर त्याने कोहलीबद्दल भाकीतही केलं आहे.