रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांनी मुंबई इंडियन्स, CSK खेळाडूंचा निवडला मिश्रित ऑलटाइम XI; सचिन तेंडुलकर, एमएस धोनी यांनाही मिळाले स्थान

या अष्टपैलू इलेव्हनचा कर्णधार एमएस धोनी याला बनविण्यात आले असून त्यात अनेक दिग्गजांचा समावेश करण्यात आला आहे. सचिन तेंडुलकरचा त्यात सलामी फलंदाज म्हणून समावेश आहे.

रोहित शर्मा, सुरेश रैना (Photo Credit: Getty)

भारतीय खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांनी एका लाईव्ह चॅट सत्रा दरम्यान आयपीएलच्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्जच्या (Chennai Super Kings) खेळाडूंचा एकत्रित संघ निवडला आहे. या अष्टपैलू इलेव्हनचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला बनविण्यात आले असून त्यात अनेक दिग्गजांचा समावेश करण्यात आला आहे. सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) त्यात सलामी फलंदाज म्हणून समावेश आहे. इंस्टाग्राम लाइव्हवर बोलताना रोहित आणि रैनाने या संघ निवडीपासून स्वत: ला दूर ठेवले. दोघांनी सांगितले की आम्ही स्वत: ची निवडत न करता आम्ही दोन्ही आयपीएल संघांचे संयुक्त ऑलटाइम इलेव्हन निवडतो. रोहितने सलामी फलंदाज म्हणून सचिन आणि मॅथ्यू हेडनचे नाव घेतले तर रैनाही त्याच्याशी सहमत होता. दोघांनी निवडलेल्या या मिश्रित ऑलटाइम इलेव्हनमध्ये  मुंबई इंडियन्सच्या पाच आणि चेन्नई सुपर किंग्जच्या सहा खेळाडूंचा समावेश आहे. हरभजन सिंहचा तीन अष्टपैलू खेळाडूंसह फिरकीपटू म्हणून समावेश करण्यात आला आहे. (IPL 2020 रद्द झाल्यास बीसीसीआयला होणार तब्बल 4000 कोटींचे नुकसान, कोषाध्यक्ष अरुण धूमल यांची माहिती)

रोहित आणि रैनाने क्रिकेटशी संबंधित इतरही काही गोष्टींबद्दल चर्चा केली. या दरम्यान रोहित म्हणाला की, आगामी काळात दोन टी-20 आणि एक वनडे वर्ल्ड कप होणार असून यामध्ये भारताने दोन कप जिंकले पाहिजेत. तो म्हणाला की रैनाने संघात पुनरागमन करावेत, आपण पुन्हा एकत्र खेळावे अशी माझी इच्छा आहे.  धोनीबाबत रोहित म्हणाला की जर तो नेट्समध्ये चांगली फलंदाजी करत असेल तर त्याने नक्कीच भारताकडून खेळले पाहिजे. रैनानेही असाच प्रतिसाद दिला. दोन्ही खेळाडूंनी वर्ल्ड कप 2011 बद्दलही चर्चा केली आणि रोहित म्हणाला की मी त्या संघात नव्हतो, त्यानंतर मी माझ्या चुका सुधारल्या.

पाहा रोहित आणि रैनाची अखेरची संयुक्त टीम:

सचिन तेंदुलकर, मॅथ्यू हेडन, फाफ डू प्लेसी, अंबाती रायुडू, किरोन पोलार्ड, एमएस धोनी (कॅप्टन), हार्दिक पंड्या, ड्वेन ब्रावो, रवींद्र जडेजा, हरभजन सिंह आणि जसप्रीत बुमराह.