T20 World Cup 2021: ‘या’ चार भारतीय खेळाडूंची स्फोटक खेळी, टी-20 विश्वचषकात विराट ब्रिगेडची रेकॉर्ड-ब्रेक कामगिरी

अफगाणिस्तानविरुद्ध फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने यंदाच्या स्पर्धेतील मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. भारत या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा संघ बनला आहे. यामध्ये चार भारतीय फलंदाजांच्या स्फोटक खेळीने मोलाची भूमिका बजावली.

हार्दिक पांड्या आणि रिषभ पंत (Photo Credit: PTI)

युएई येथे पहिल्या दोन आयसीसी टी-20 विश्वचषक सामन्यात पराभवाचे तोंड पाहिल्यावर भारतीय संघाने (Indian Team) मंगळवारी अबू धाबी येथे झालेल्या आयसीसी पुरुष T20 विश्वचषकच्या  (ICC Men's T20 World Cup) त्यांच्या सुपर 12 सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध (Afghanistan) 66 धावांनी दणकेबाज विजय मिळवला. अफगाणिस्तानविरुद्ध फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने यंदाच्या स्पर्धेतील मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. भारत या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा संघ बनला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुलच्या (KL Rahul) अर्धशतकांच्या जोरावर भारताने 20 षटकात 2 गडी गमावून 210 धावांचा डोंगर उभा केला होता. यासह विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने त्यांच्या शेवटच्या सामन्यात स्कॉटलंडविरुद्ध 190 धावा करणाऱ्या अफगाणिस्तानला मागे टाकले. टॉस गमावून पहिले फलंदाजीला उतरल्यानंतर भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 140 धावांची भक्कम भागीदारी केली. (IND vs AFG, T20 World Cup 2021: टीम इंडियाची चाहत्यांना दिवाळी भेट, अफगाणिस्तानचा 66 धावांनी धुव्वा उडवून विश्वचषकात वाजवलं विजयाचं बिगुल)

दोघांनी अशी फलंदाजी केली ज्यामुळे भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला गेला. या दोन्ही फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली आणि त्यानंतर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) व रिषभ पंत (Rishabh Pant) यांनी झटपट खेळी करत 200 धावांचा टप्पा पार केला. उल्लेखनीय म्हणजे वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांच्यानंतर रोहित आणि राहुल टी-20 विश्वचषकात पहिल्या विकेटसाठी शंभराहून अधिक भागीदारी करणारी दुसरी भारतीय सलामी जोडी ठरली. यासह भारतीय संघाने टी-20 विश्वचषक 2021 मधील सर्वात मोठी धावसंख्या उभी केली. या स्पर्धेत आतापर्यंत कोणत्याही संघाने 200 धावांचा टप्पा ओलांडलेला नव्हता. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत 200 पेक्षा अधिक करणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. टीम इंडियाची अफगाणिस्तानविरुद्ध 210 धावा ही आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. रोहित शर्मा आणि केएल राहुलने अर्धशतकांसह चांगली सुरुवात केली. रोहितने 74, तर राहुलने 69 धावांची खेळी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर हार्दिकने 13 चेंडूत 35 तर पंतने तितक्याच चेंडूत 27 धावा केल्या.

दरम्यान, पहिले फलंदाजी करताना टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. 2007 मध्ये त्यांनी केनियाविरुद्ध 6 बाद 260 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर 2016 मध्ये दक्षिण आफ्रिकेने 4 गडी गमावून 229 धावा केल्या होत्या. भारतीय संघ या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 2007 मध्ये त्यांनी इंग्लंडविरुद्ध 218 धावा केल्या होत्या. तसेच दक्षिण आफ्रिका 211 धावांसह चौथ्या स्थानावर आणि आता 2021 मध्ये 210 धावांच्या जोरावर भारत पाचव्या स्थानावर पोहोचण्यात यशस्वी झाला आहे.