T20 World Cup 2024: रिंकूचा फोन आला आणि..., विश्वचषकात निवड न झाल्याने रिंकू सिंगच्या वडिलांनी मनातील खंत केली व्यक्त (Watch Video)

त्याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले असले तरी आता त्याचे वडील खानचंद्र सिंग सांगतात की आपल्या मुलाला प्लेइंग इलेव्हनमध्ये पाहण्याची आशा होती.

Rinku Singh (Photo Credit - X)

T20 World Cup 2024: रिंकू सिंगला (Rinku Singh) वर्ल्डकपसाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. रिंकूची निवड न झाल्याने केवळ चाहतेच नाही तर अनेक क्रिकेट तज्ज्ञही हैराण झाले आहेत. त्याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले असले तरी आता त्याचे वडील खानचंद्र सिंग सांगतात की आपल्या मुलाला प्लेइंग इलेव्हनमध्ये पाहण्याची आशा होती. रिंकूचे कुटुंब फटाके फोडण्याच्या तयारीत होते, मात्र संघांची माहिती मिळताच सर्वांची निराशा झाली. एका मुलाखतीत रिंकू सिंगच्या वडिलांनी सांगितले की, "खूप अपेक्षा होत्या आणि त्यामुळेच थोडे दु:ख आहे. (हे देखील वाचा: IPL 2024: मैदानात फ्लाईंग किस देणाऱ्या KKRच्या खेळाडूवर मोठी कारवाई, एक सामन्यासाठी बंदी!)

पाहा व्हिडिओ

ते पुढे म्हणाले, आम्ही पेढे आणि फटाकेही आणले होते आणि रिंकू प्लेइंग इलेव्हनमध्ये राहील असा विचार करत होतो. पण, त्याचेही मन दुखले आहे. त्याच्या आईशी बोलून सांगितले की त्याचे नाव 11 किंवा 15 खेळाडूंमध्ये नाही, पण तरीही तो संघासोबत जात आहे. रिंकू सिंगची निवड न झाल्याने लोक निराश झाले आहेत कारण 2023 मध्ये पदार्पण केल्यानंतर, रिंकूने भारतासाठी 15 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 89 च्या सरासरीने 356 धावा केल्या आहेत.

पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना रिंकू सिंगही भारतासाठी फिनिशरची भूमिका बजावत आहे. गेल्या वर्षी, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील 2 सामन्यांत जलद 82 धावा केल्या, ज्यात 68 धावांची झंझावाती खेळी देखील समाविष्ट होती. त्याआधी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 डावात 52.5 च्या उत्कृष्ट सरासरीने 105 धावा केल्या होत्या. हा उत्कृष्ट फॉर्म असूनही त्याला भारतीय संघात स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्याच्यासोबत शुभमन गिल, आवेश खान आणि खलील अहमद यांना टी-20 विश्वचषक 2024 साठी राखीव खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले आहे.