IPL Auction 2025 Live

वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप: राहुल अवारे ने जिंकले कांस्यपदक, स्पर्धेत भारताचे आजवरचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन

राहुलने 61 किलो वजनी गटात पदक मिळवले. जागतिक कुस्ती स्पर्धेच्या इतिहासातील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. यापूर्वी भारताने 2013 मध्ये तीन पदके जिंकली होती.

राहुल अवारे (Photo Credit: IANS)

रविवारी भारताच्या राहुल बाळासाहेब अवारे (Rahul Aware) यांनी जागतिक कुस्ती स्पर्धेत (World Wrestling Championships) कांस्यपदक जिंकले आहे. राहुलने 61 किलो वजनी गटात पदक मिळवले. हे भारताचे स्पर्धेतील पाचवे पदक आहे. कझाकस्तानच्या नूर-सुलतान येथे झालेल्या कांस्यपदक मॅचमध्ये त्याने 17 वे मानांकित अमेरिकन कुस्तीपटू टायलर ली ग्राफला पराभूत करून पदक जिंकले. कॉमनवेल्थ गेम्समधील सुवर्णपदक जिंकणाऱ्या राहुलने कांस्यपदकाच्या सामन्यात अमेरिकेच्या कुश्तीपटूला 11-4 असे पराभूत केले. या स्पर्धेदरम्यान भारताने चार टोकियोऑलिम्पिक कोटा मिळवले आहेत. दरम्यान, जागतिक कुस्ती स्पर्धेच्या इतिहासातील भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. यापूर्वी भारताने 2013 मध्ये तीन पदके जिंकली होती. (वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला मोठा धक्का; फायनलआधी दीपक पुनिया Out, ऐतिहासिक रौप्यपदक जिंकले)

दरम्यान, या चँपियनशिपमध्ये राहुलच्या अगोदर दीपक पुनिया ने रौप्यपदक आणि विनेश फोगाट, बजरंग पुनिया आणि रवि कुमार दहिया यांनी आपापल्या वजन प्रकारात कांस्यपदक जिंकले आहेत. दुसरीकडे, कांस्यपदक जिंकूनही राहुल 2020 वर्षी टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही, कारण राहुलचा 61 किलो वजन वर्ग हा ऑलिम्पिक कोटाचा भाग नाही.

सामन्याच्या सुरूवातीस महाराष्ट्राचा राहुल 0-2 ने मागे होता. त्यानंतर त्याने 2-2 अशी बरोबरी साधली आणि नंतर 4-2 अशी आघाडी मिळवली. त्यानंतर भारतीय पैलवानने आणखी दोन गुणांसह 6-2 अशी भक्कम आघाडी घेतली. यानंतर राहुलने सलग गुण घेत 10-2 आणि त्यानंतर 11-2 स्कोर केला. यानंतर त्याने 11-4 असे जिंकून कांस्यपदक जिंकले. सेमीफायनलमध्ये राहुलचा जॉर्जियाच्या बेका लॉमटाडिजकडून 6-10 ने पराभूत झाला.