PBKS vs MI, IPL 2024 Head to Head: मुंबई इंडियन्सपुढे पंजाब किंग्जचे कडवे आव्हान, कोण कोणावर वरचढ? जाणून घ्या आकडेवारी
यादरम्यान पंजाब किंग्ज संघाने 15 सामने जिंकले आहेत. तर मुंबई इंडियन्स संघाला 16 सामने जिंकता आले आहेत.
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स (Punjab Kings Vs Mumbai Indians)यांच्यामध्ये आज आयपीएलमधील (IPL 2024) साखळी फेरीची लढत रंगणार आहे. याप्रसंगी दोन्ही संघ या लढतीत यंदाच्या मोसमातील आव्हान कायम राखण्यासाठीच मैदानात उतरणार आहेत. संघांनी सहा सामन्यांमधून फक्त दोन सामन्यांमध्ये विजय मिळवले असून चार सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन्ही संघांच्या निव्वळ सरासरीमध्ये थोडासाच फरक आहे. यामुळे दोन्ही संघातील हा सामना फारच महत्त्वाचा असून मुल्लानपूर येथे गोलंदाजांना मदत करणारी खेळपट्टी असल्यामुळे फलंदाजांसमोर आव्हान असणार आहे. (हेही वाचा - DC Beat GT, IPL 2024 32nd Match Live Score Update: 6 विकेट राखत दिल्ली कॅपिटल्सने जिंकला सामना, गुजरात टायटन्सचा दारुण पराभव)
हे दोन्ही संघ आतापर्यंत 31 वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान पंजाब किंग्ज संघाने 15 सामने जिंकले आहेत. तर मुंबई इंडियन्स संघाला 16 सामने जिंकता आले आहेत. हा रेकॉर्ड पाहता दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत बरोबरीची लढत पाहायला मिळाली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यातही दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.
मुंबईला गेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. असं असलं तरीदेखील हार्दिक पंड्या प्लेइंग 11 मध्ये फार काही बदल करणार नाही. रोहित शर्मा आणि इशान किशन डावाची सुरुवात करताना दिसून येतील. तर सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्ड हे फलंदाजीत योगदान देताना दिसून येतील. तर जसप्रीत बुमराह, श्रेयस गोपाल, आकाश मधवाल आणि कोएत्जी यांच्यावर गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी असणार आहे.