PSL 2022: लाहोर कलंदरने जिंकला पहिला पीएसएलचा किताब; रोहित शर्मा याला मागे टाकून Shaheen Afridi ने रचला T20 विश्वविक्रम
PSL 2022: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने रविवारी ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांना मागे टाकत टी-20 क्रिकेटमध्ये एक मोठा विश्वविक्रम नोंदवला आणि त्याच्या नेतृत्वात लाहोर कलंदर्सने गद्दाफी स्टेडियमवर मुलतान सुलतान विरुद्ध पाकिस्तान सुपर लीग (PSL) स्पर्धेचे पहिले विजेतेपद पटकावले.
PSL 2022 Final: पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) टी-20 स्पर्धेला नवीन विजेता मिळाला आहे. लाहोर कलंदरचा (Lahore Qalanders) संघ पाकिस्तान सुपर लीगचा नवा चॅम्पियन बनला आहे. शाहीन शाह आफ्रिदीच्या (Shaheen Shah Afridi) संघाने मुलतान सुलतान्सचा (Multan Sultan) 42 धावांनी पराभव केला आणि लाहोरने टी-20 लीगचे पहिले विजेतेपद पटकावले. शाहीन आफ्रिदीच्या लाहोर संघाने अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावून 180 धावा केल्या. प्रत्युत्तरात मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वातील मुलतान सुलतान संघ 138 धावांत गारद झाला. यासह आफ्रिदीने रविवारी ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांना मागे टाकून T20 क्रिकेटमध्ये एक मोठा विश्वविक्रम नोंदवला आणि टी-20 लीगचे जेतेपद पटकावणारा सर्वात युवा कर्णधार ठरला.
शाहीन आफ्रिदीने वयाच्या 21 व्या वर्षी टी-20 क्रिकेटचे विजेतेपद पटकावले. युवा आफ्रिदीने वयाच्या 22 व्या वर्षी सिडनी सिक्सर्सला 2012 मध्ये बिग बॅश लीगमध्ये किताब जिंकणाऱ्या स्मिथ आणि रोहितला, ज्याने 2013 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी मुंबई इंडियन्सला पहिल्यांदा इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचे चॅम्पियनशिप मिळवून दिले. दरम्यान, स्पर्धेबद्दल बोलायचे तर लाहोर संघ त्यांच्या पहिल्या सहा हंगामांपैकी पाच हंगामात प्लेऑफसाठी पात्र ठरू शकला नाही आणि 2022 मध्ये ट्रॉफी जिंकण्यापूर्वी 2020 मध्ये उपविजेते ठरले होते.
याशिवाय लाहोर आणि मुलतान संघातील अंतिम सामन्याबद्दल बोलायचे तर त्यांच्या घरच्या प्रेक्षकांसमोर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर लाहोर कलंदर्सने पॉवरप्लेमध्ये तीन विकेट गमावल्या. पाकिस्तानचा वरिष्ठ खेळाडू मोहम्मद हाफीजने सामन्यात अष्टपैलू कामगिरी केली. प्रथम खेळताना लाहोर कलंदर संघाने 25 धावांत 3 गडी गमावले. यानंतर हाफिजने 46 चेंडूत 69 धावा करत संघाचा मोर्चा सांभाळला. हॅरी ब्रुकने 22 चेंडूत नाबाद 41 आणि डेविड विसेने 8 चेंडूत नाबाद 28 धावा करत संघाला 180 धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या मुलतान सुलतान संघाची सुरुवात चांगली झाली नाही. 50 धावांवर संघाने 4 मोठ्या विकेट गमावल्या. कर्णधार मोहम्मद रिझवान केवळ 14 धावाच करू शकला. तर टीम डेविडने 27 आणि खुशदिल शाहने 32 धावा करत संघाला सांभाळण्याचा प्रयत्न केला, मात्र 19.3 षटकात 138 धावा करून संपूर्ण संघ बाद झाला. ऑफस्पिनर हाफिजने 4 षटकात 23 धावा देत 2 बळी घेतले. याशिवाय शाहीन आफ्रिदीनेही 30 धावा देऊन 3 गडी बाद केले.