Ind vs NZ Semi Final 2019: भारताच्या पराभवावर पीएम मोदी यांनी व्यक्त केली निराशा, तर राहुल गांधी यांच्या मते संघ ठरला प्रेमास पात्र
यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचाही समावेश होता.
आयसीसी विश्वचषक 2019 (ICC World Cup 2019) च्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने भारताला 18 धावांनी हरविले. भारताचा हा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. अगदी पहिल्या बॉलपासून भारतीय संघाकडून फार मोठ्या अपेक्षा असलेल्या दिसून येत होत्या. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचाही समावेश होता. भारताच्या पराभवानंतर नरेंद्र मोदी यांनी निराशा व्यक्त केली. मात्र, विजय आणि पराभव हा जीवनाचा एक भाग आहे असे त्यांनी म्हटले आहे.
सामना संपल्यावर नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये मोदीजी म्हणतात, ‘सामन्याचा रिझल्ट हा अतिशय निराशाजनक आहे, परंतु ज्याप्रकारे शेवटपर्यंत टीम इंडियाने आपली लढाऊ वृत्ती दाखवली ते पाहून आनंद झाला. भारताने संपूर्ण स्पर्धेत उत्तम गोलंदाजी, उत्तम फलंदाजी आणि उत्तम फिल्डिंग करत चांगली कामगिरी दाखवली, ज्याचा आम्हाला अभिमान आहे. विजय आणि पराभव हा जीवनाचा एक भाग आहे. भारतीय संघाला भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.’ अशाप्रकारे आपली निराशा आणि त्यातून निर्माण होणारी आशा नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे राहुल गांधी यांनीही पराभव झाला तरी संघाप्रती असलेला आपला अभिमान आणि प्रेम व्यक्त केले आहे. राहुल गांधी म्हणतात, ‘भारतीय संघाच्या पराभवाने अनेकांना धक्का बसला असेल. मात्र ज्या प्रकारे भारतीय संघ खेळला ते पाहता संघ आपल्या सर्वांच्या प्रेमास पात्र ठरला आहे. न्यूझीलंडला त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन.’ (हेही वाचा: झीलंड विरुद्ध सेमीफाइनलमध्ये Team India पराभूत पण या खेळाडूने जिंकली सगळ्यांची मनं)
दरम्यान, न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांचा पाठलाग करत टीम इंडिया ला 211 धावांचीच मजल मारता आली. भारताला हरवत न्यूझीलंड दुसऱ्यांदा विश्वचषकच्या फिनालमध्ये पोहचले आहे. धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्या जोडीने भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण अंतिम 5 ओव्हरमध्ये मोठे शॉट्स मारण्याच्या नादात आपली विकेट गमावून बसले. जडेजा 77 धावा केल्या तर धोनीने 72 चेंडूत 50 धावा केल्या.