पाकिस्तानी कर्णधार Babar Azam च्या झंझावाती शतकाने वाढवली भारताची चिंता, T20 WC पूर्वी कोहलीला ओव्हरटेक करून एलिट यादीत रोहित शर्माची केली बरोबरी

तसेच सर्वात जास्त टी-20 शतकांच्या यादीत आजमने भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही मागे टाकले. बाबरने रोहित शर्मा आणि शेन वॉटसन यांच्या फलंदाजांच्या यादीत सर्वाधिक टी-20 शतकांची बरोबरी केली.

बाबर आजम (Photo Credit: Twitter/ESPNcricinfo)

पाकिस्तानचा (Pakistan) कर्णधार बाबर आजमने (Babar Azam) गुरुवारी देशातील फलंदाजाकडून सर्वाधिक टी-20 शतकांच्या नव्या विक्रमाची नोंद केली. रावलपिंडी (Rawalpindi) येथील राष्ट्रीय टी-20 चषकात नॉर्थनविरुद्ध सेंट्रल पंजाब (Central Punjab) कडून खेळताना बाबरने आपले सहावे टी-20 शतक ठोकले. यापूर्वी अहमद शेहजाद आणि कामरान अकमल यांनी प्रत्येकी 5 टी-20 शतक झळकावले होते. तसेच सर्वात जास्त टी-20 शतकांच्या यादीत आजमने भारताचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) मागे टाकले. कोहलीने 315 सामन्यांत 5 शतके केली आहेत, तर बाबरने 194 सामन्यात 6 शतके केली आहेत. बाबरने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शेन वॉटसन यांच्यासारख्या फलंदाजांच्या यादीत सर्वाधिक टी-20 शतकांच्या यादीत बरोबरी केली. रोहित शर्मा, शेन वॉट्सन आणि बाबर यांनी आता प्रत्येकी टी-20 क्रिकेट सहा वेळा शंभरी धावसंख्या गाठली आहे. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड वेस्ट इंडिजच्या क्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने आतापर्यंत 448 सामन्यात 22 शतके केली आहेत.

तथापि, बाबर आजमचे रेकॉर्डब्रेक शतक व्यर्थ ठरले कारण 20 ओव्हरमध्ये 200 धावांचा डोंगर उभारूनही सेंट्रल पंजाबने राष्ट्रीय टी-20 चषकातील 11 व्या सामन्यात नॉर्दनला हरवले. बाबरने 63 चेंडूत 105 धावांच्या खेळीत 3 षटकार आणि 11 चौकार मारले. त्याने सह-सलामीवीर अहमद शेहजादसह 63 धावांची भागीदारी रचली. बाबरने केवळ 58 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. बाबरने 18 व्या षटकात आपले पाकिस्तानी सहकारी गोलंदाज हॅरिस रौफच्या चेंडूंवर सलग 3 चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. बाबर नाबाद राहिला तर शोएब मलिकने (21 चेंडूत 31) सेंट्रल पंजाबला 200 धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात हैदर अलीच्या 53 चेंडूत 91 च्या जबरदस्त खेळीने 6 षटकार आणि तितक्याच चौकारांसह नॉर्दर्नला यशस्वीरीत्या धावसंख्या गाठून दिली. अखेरीस मोहम्मद नवाज (21 चेंडू 41) आणि आसिफ अली (14 चेंडू 28) यांनी नॉर्दर्न 19.4 ओव्हरमध्ये संघाला विजयीरेष ओलांडून दिली.

दुसरीकडे, पाकिस्तानी राष्ट्रीय संघाचा कर्णधार बाबर आजम नक्कीच आपल्या खुश असेल. कारण तो टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी मोठ्या धावा करत आहे. पाकिस्तान 24 ऑक्टोबर रोजी दुबईत कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध आपल्या मोहीमेची सुरुवात करेल. न्यूझीलंड आणि इंग्लंड संघांचा दौरा रद्द झाल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू घरगुती टी-20 स्पर्धेत व्यस्त आहेत आणि विश्वचषक स्पर्धेची तयारी करत आहेत. विश्वचषकात पाकिस्तानला भारताविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे आणि त्याआधीच कर्णधार बाबरने धडाकेबाज शतक झळकावून आपला हेतू स्पष्ट केला आहे.