PAK vs BAN 1st Test: बांग्लादेशविरुद्ध पाकिस्तानी नसीम शाह ने वयाच्या 16 व्या वर्षी घेतली टेस्ट हॅटट्रिक, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवत रचला इतिहास, पाहा Video
आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा नसीम सर्वात कमी वयाचा गोलंदाज ठरला.
यजमान पाकिस्तान (Pakistan( आणि बांग्लादेश (Bangladesh) मध्ये सध्या रावळपिंडी येथे 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा 16 वर्षाचा वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) याने बांग्लादेशविरूद्ध कहर केला. पहिल्या डावात फक्त एक विकेट घेणार्या नसीमने दुसऱ्या डावात हॅटट्रिक घेत इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा नसीम सर्वात कमी वयाचा गोलंदाज ठरला. नसीमने वयाच्या 16 वर्ष 359 दिवसांत कसोटी सामन्यात सलग 3 बॉलमध्ये 3 विकेट घेतल्या. 15 फेब्रुवारी रोजी नसीम 17 वर्षांचा होईल. मात्र, पुढच्याच षटकात त्याला मैदान सोडावे लागले. त्याच्या पायाला क्रैंप आल्याचे दिसत होते.
दुसर्या डावात पाकिस्तानकडून 41 वी ओव्हर टाकण्यासाठी आलेल्या नसीमने पहिल्या 3 चेंडूत 3 धावा दिल्या. त्यानंतर चौथ्या चेंडूवर नजमुल हुसैनला एलबीडब्ल्यू, तैजुल इस्लामलाही एलबीडब्ल्यू आणि अखेरच्या चेंडूवर अनुभवी महमुदुल्ला ला हरिस सोहेलकडे कॅच आऊट केले आणि हॅटट्रिक पूर्ण केली. पाहा नसीमच्या हॅटट्रिकचा हा व्हिडिओ:
दरम्यान, 2002 नंतर पाकिस्तानी गोलंदाजाने घेतलेली कसोटी क्रिकेटमधील ही पहिली हॅटट्रिक आहे. यापूर्वी, मोहम्मद सामीने श्रीलंकेविरुद्ध हॅटट्रिक घेतली होती. इतकेच नाही तर आपला पाचवा टेस्ट खेळणार्या नसीमने डिसेंबर 2019 मध्ये कसोटी सामन्यात पाच विकेट हॉल घेण्याच्या बाबतीतही विश्वविक्रम केला होता. त्यावेळी टेस्टच्या एका डावात 5 विकेट घेणारा तो सर्वात युवा गोलंदाज ठरला. तिसर्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बांग्लादेशने 126 धावांवर 6 विकेट्स गमावल्या आणि ते अद्याप पाकिस्तानच्या पहिल्या डावातील धावांच्या तुलनेत 86 धावांनी पिछाडीवर आहेत. बांग्लादेश सध्या दुसऱ्या डावात फलंदाजी करत आहे आणि पाकिस्तान डावाने विजयापासून चार विकेट दूर आहे. रावळपिंडी कसोटी सामना चौथ्या दिवशी संपुष्टात येईल असे दिसत आहे.