On This Day in 2012: विराट कोहलीने आजच्या दिवशी केला होता कहर, Lasith Malinga याच्या एका ओव्हरमध्ये 24 धावा लुटत टीम इंडियासाठी मिळवला रेकॉर्ड विजय

श्रीलंकेविरुद्ध कोहलीने कठीण परिस्थितीत टीम इंडियाला कॉमनवेल्थ ट्राय सीरिजमध्ये रेकॉर्ड-ब्रेक विजय मिळवून दिला होता. या विजयाची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारताने श्रीलंकेच्या दर्जेदार गोलंदाजांविरुद्ध 321 धावांच टार्गेट भारतीय संघाने अवघ्या 36.4 ओव्हरमध्ये गाठले.

विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

On This Day in 2012: 28 फेब्रुवारी, 2012 रोजी होबर्टमध्ये (Hobart) विराट कोहलीने (Virat Kohli) जगाला दाखवून दिले की तो मोठ्या गोष्टींसाठी तयार आहे. ऑस्ट्रेलिया येथे श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) कॉमनवेल्थ बँकेच्या तिरंगी (Tri-Series) मालिकेतील वनडेपूर्वी 8 शतकांसह स्टार फलंदाजाने 81 सामने खेळले आणि 3100 धावा केल्या. होबार्ट येथे श्रीलंकेच्या उच्च-गुणवत्तेच्या गोलंदाजी हल्ल्याविरुद्ध टीम इंडिया (Team India) 321 धावांचा पाठलाग करीत होती आणि तिरंगी मालिकेच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना अवघ्या 40 ओव्हरमध्ये धावसंख्या गाठायची होती. श्रीलंकेकडून तिलकरत्ने दिलशानच्या 160 आणि कुमार संगकाराच्या शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकाने तीनशेपार धावसंख्या गाठली. प्रत्युत्तरात वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी केवळ 6.4 ओव्हरमध्ये 54 धावांची सलामी भागीदारी केली. तथापि, दोन्ही सलामी फलंदाजांना चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही. तेंडुलकर 9व्या आणि सेहवाग 10व्या ओव्हरमध्ये बाद झाल्यावर गौतम गंभीरसह कोहली खेळपट्टीवर आला. (On This Day in 2010: सचिन तेंडुलकर यांनी आजच्या दिवशी रचला होता विक्रम; एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकवणारा ठरला होता पहिला खेळाडू)

आधुनिक क्रिकेटमधील अनुभवी फलंदाजांपैकी कोहलीने ऑस्ट्रेलियामध्ये श्रीलंकेविरुद्ध कठीण परिस्थितीत टीम इंडियाला कॉमनवेल्थ बँक ट्राय सीरिजमध्ये रेकॉर्ड-ब्रेक विजय मिळवून दिला होता. या विजयाची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भारताने श्रीलंकेच्या दर्जेदार गोलंदाजांविरुद्ध 321 धावांच टार्गेट भारतीय संघाने अवघ्या 36.4 ओव्हरमध्ये गाठले. सेहवाग आणि सचिनची सुरुवात उत्तम असूनही भारतीय संघ अडचणीत सापडला होता. यानंतर कोहली आणि गौतम गंभीर यांनी जबाबदारी स्वीकारली. दोघांनी लसिथ मलिंगा, नुवान कुलसेकरा, फरवीज माहरूफ आणि रंगना हेराथ यांच्या श्रीलंकन गोलंदाजांचा प्रतिकार केला. हॉबर्टमध्ये खेळलेल्या या सामन्यात कोहलीची फलंदाजी पाहण्यासारखी होती. दबावाखाली कोहलीने ज्या प्रकारे फलंदाजी केली त्याचे आजही उदाहरण दिले जाते. विराटने मलिंगाच्या परफेक्ट यॉर्करवर भरपूर चौकार लगावले आणि तिसर्‍या विकेटसाठी गंभीरसह 115 धावांची भागीदारी केली.

त्यानंतर गंभीर 63 धावांवर बाद झाला. टीम इंडियाला 76 चेंडूत विजयासाठी 121 धावांची आवश्यकता होती. यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या सुरेश रैनावर श्रीलंकेवर दबाव आणण्यास सुरवात केली. दबावाखाली कोहलीने आपले गियर बदलले आणि मलिंगा व कुलसेकराची धुलाई केली. मलिंगा डावातील 35वी ओव्हर टाकण्यासाठी आला आणि पहिल्याच चेंडूवर कोहलीने दोन धावा घेतल्या. दुसर्‍या बॉलवर त्याने षटकार खेचला. यानंतर सलग 4 चौकारांनी एकूण 24 धावा लुटल्या. विराटने 86 चेंडूत नाबाद 133 धावा केल्या ज्यात 16 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. आपल्या या खेळीसह कोहलीने आपल्या आगमनाची घोषणा केली आणि उर्वरित दशकात तो विश्व क्रिकेटवर वर्चस्व गाजवणार असल्याचे दाखवून दिले.