On This Day! आजच्या दिवशी टीम इंडियाने खेळले होते वर्ल्ड कपमधील 'हे' दोन प्रसिद्ध सामने; थरारक सामन्यात अशी होती भारताची स्थिती
या तारखेला भारतीय चाहत्यांना अश्रू अनावर झाले होते आणि ही ती तारीख आहे जेव्हा टीम इंडियाच्या चाहत्यांनी असा उत्सव साजरा केला ज्याचे संपूर्ण जग साक्षीदार बनला होता.
भारतीय क्रिकेट संघ सध्या (Indian Cricket Team) जगातील सर्वात मजबूत संघांपैकी एक आहे. तिन्ही फॉर्मेटमध्ये भारत सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. आजच्या दिवशी भारताने दोन विश्वचषक सामने खेळले त्यामुळे, 23 मार्चची तारीख भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून कधीच न विसरू शकणारी आहे. या तारखेला भारतीय चाहत्यांना अश्रू अनावर झाले होते आणि ही ती तारीख आहे जेव्हा टीम इंडियाच्या चाहत्यांनी असा उत्सव साजरा केला ज्याचे संपूर्ण जग साक्षीदार बनला होता. यातील पहिला म्हणजे 2003 चा भारत (India)-ऑस्ट्रेलियामधील (Australia) वर्ल्ड कप फायनल (World Cup Final) सामना. आजच्या अवघ्या 17 वर्षांपूर्वी 23 मार्च 2003 रोजी भारताला दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची संधी गमावली होती. जोहान्सबर्गच्या मैदानावर भारत-ऑस्ट्रेलिया संघ फायनलमध्ये आमने-सामने आले होते. हा सामना एकतर्फी राहिला आणि ऑस्ट्रेलियाने सलग दुसर्यांदा विश्वचषक जिंकला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 2 विकेट्स गमावून 359 धावांची विशाल धावसंख्या रचली. प्रत्युत्तरात भारत 234 धावांवर ऑलआऊट झाला आणि ऑस्ट्रेलिया 125 धावांनी विजय मिळवला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार रिकी पॉन्टिंगने शतकी खेळी केली. पॉन्टिंगने 121 चेंडूंत नाबाद 140 धावा ठोकल्या होत्या. दुसरीकडे, भारताकडून वीरेंद्र सहवागने 82 धावांचा डाव खेळला आणि भारताच्या आशा कायम ठेवल्या होत्या. सचिन तेंडुलकर पहिल्याच ओव्हरमध्ये बाद झाला. सौरव गांगुली 24 आणि मोहम्मद कैफ शून्यावर बाद झाला. टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी 23 मार्चची तारीख यासाठीही संस्मरणीय आहे कारण या दिवशी धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने बांग्लादेशला (Bangladesh) एका धावानी पराभूत केले. 2016 मध्ये भारत-बांग्लादेशमध्ये आयसीसी वर्ल्ड टी-20 सामना खेळला गेला होता, ज्यामधील थरार शेवटच्या बॉलपर्यंत चालला होता. आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात बांग्लादेश भारताविरुद्ध विजय मिळवण्याच्या उंबरठ्यावर होता.
सामन्याची अंतिम ओव्हर हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) टाकली. पांड्या तीन चेंडूंतून दोन धावा वाचवण्यासाठी दबावाखाली होता, पण धोनीने त्याला काही सल्ला दिला आणि चौथ्या चेंडूवर रहीम आणि त्यानंतर पाचव्या चेंडूवर महमूदुल्ला मोठा शॉट मारण्याच्या प्रयत्नात आऊट झाला. बांग्लादेशला जिंकण्यासाठी अखेरच्या चेंडूवर दोन आणि सामना ड्रॉ करण्यासाठी एक धाव करण्याची गरज होती. अखेरच्या चेंडूवर धोनीने बांग्लादेशी फलंदाजाला धावबाद केले आणि भारताने एक धावाने सामना जिंकला.