MS Dhoni Retires: ICC च्या तीन मोठ्या ट्रॉफी जिंकणारा एमएस धोनी एकमेव कर्णधार, पाहा त्याच्या करिअरमधील 5 खास क्षण
धोनीने 16 वर्षाच्या आपल्या करिअरमध्ये अनेक उपलब्धता मिळवली आहे. आयसीसीच्या तीन मुख्य ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार आहे.
माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज 39-वर्षीय महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni), ज्याच्या नेतृत्वात भारताने दोन विश्वचषक जिंकले, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने शनिवारी 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला ब्रेक लगावला. धोनीने डिसेंबर 2004 मध्ये बांग्लादेशविरुद्ध एकदिवसीय सामने खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी तो आयपीएल खेळत राहिला. त्यामुळे, त्याचे चाहते अजून तरी त्याला क्रिकेटच्या मैदानावर खेळताना पाहू शकतात. धोनीने यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. धोनीने डिसेंबर 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. या व्यतिरिक्त धोनीने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध फेब्रुवारी 2019 मध्ये बेंगळुरू येथे खेळला होता, तर वर्ल्ड कप सेमीफायनल (10 जुलै, 2019) त्याचा अखेरचा वनडे सामना होता. धोनीने 16 वर्षाच्या आपल्या करिअरमध्ये अनेक उपलब्धता मिळवली आहे. आयसीसीच्या तीन मुख्य ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार आहे. (MS Dhoni Announces Retirement: भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा)
धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2007 टी-20 वर्ल्ड कप, 2011 वनडे वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा मान मिळवला. इतकच नाही तर धोनीच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदा कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांकाचा स्वाद घेतला. तर आयपीएलमध्ये देखील त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने तीनदा विजयाची चव चाखली. 2004 ते 2007 या काळात धोनीची कारकीर्द चढउतार झाली. 2007 टी-20 विश्वचषकात जेव्हा सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरभ गांगुलीसारख्या खेळाडूंनी स्वत:ला त्यापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा धोनीला संघाची कमान देण्यात आली होती. आणि त्यानंतर त्याच्या नेतृत्वात असलेल्या एका युवा संघाने पहिला टी-20 विश्वचषक जिंकला. धोनी, एक यशस्वी कर्णधारच नाही तर सर्वोत्तम विकेटकीपर देखील राहिला. त्याने आपल्या चपळतेने स्टॅम्पिंग करत भारतासाठी अनेक सामन्यांचा निकाल बदलला.
धोनीने भारतासाठी 350 वनडे सामन्यात 50.57 च्या सरासरीने 10773 धावा केल्या आहेत, ज्यात 10० शतके आणि 73 अर्धशतकांचा समावेश आहे.या दरम्यान, त्याची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 183 अशी होती. धोनीने 90 कसोटी सामन्यांमध्ये 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या आहेत, त्यामध्ये 6 शतके आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. यावेळी, त्याची सर्वोत्तम धावसंख्या 224 धावा होती. विशेष म्हणजे, धोनीने वनडे आणि कसोटी शतक दोन्ही एकाच संघाविरुद्ध, पाकिस्तानविरुद्ध ठोकले.