Mohammad Shami ला मिळू शकतो क्रीडा क्षेत्रातील सर्वात मोठा पुरस्कार, BCCI ने क्रीडा मंत्रालयाला केली विनंती
आता या खेळातील सर्वात मोठ्या पुरस्काराच्या यादीत मोहम्मद शमीचे नाव समाविष्ट झाले आहे. यानंतर मोहम्मद शमीला लवकरच अर्जुन पुरस्कार (Arjuna Award) मिळू शकतो असे दिसते.
Mohammad Shami: टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammad Shami) सध्या क्रिकेटपासून दूर आहे मात्र लवकरच शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये (ICC World Cup 2023) अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या शमीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता या खेळातील सर्वात मोठ्या पुरस्काराच्या यादीत मोहम्मद शमीचे नाव समाविष्ट झाले आहे. यानंतर मोहम्मद शमीला लवकरच अर्जुन पुरस्कार (Arjuna Award) मिळू शकतो असे दिसते. वृत्तानुसार, बीसीसीआयने (BCCI) क्रीडा मंत्रालयाला याची शिफारस केली आहे. (हे देखील वाचा: IND vs SA 3rd T20I Weather Updates: भारत आणि दक्षिण आफ्रिकामधील तिसऱ्या टी-20 सामन्यावर पावसाचे मोठे संकट, सामना होऊ शकतो रद्द)
वर्ल्डकप 2023 मध्ये केली होती मोठी कामगिरी
2023 च्या विश्वचषक स्पर्धेत मोहम्मद शमीला फक्त 7 सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याला पहिल्या 3 सामन्यांमधून बाहेर ठेवण्यात आले होते. पण चौथ्या सामन्यात शमी प्लेईंग इलेव्हनमध्ये परतल्यावर त्याने आपल्या गोलंदाजीने फलंदाजांचे षटकार काढून घेतले. शमीने केवळ 7 सामन्यात 24 विकेट घेतल्या होत्या. मोहम्मद शमी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला होता.
शमी दुखापतीमुळे संघाबाहेर
शमीने या स्पर्धेत तीनवेळा 5 विकेट घेतल्या होत्या. त्याची धोकादायक गोलंदाजी प्रत्येक संघाविरुद्ध पाहायला मिळाली. सध्या शमी दुखापतीमुळे संघाबाहेर आहे पण आता तो बरा झाल्यानंतर मैदानात परतण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आता शमी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेत खेळताना दिसणार आहे.
शमीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द
शमीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने टीम इंडियासाठी 64 कसोटी, 101 एकदिवसीय आणि 23 टी-20 सामने खेळले आहेत. शमीच्या नावावर कसोटीत 229, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 195 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 24 बळी आहेत.