IND vs SA: अश्विनच्या गोलंदाजीवर मिलर आणि मार्करामने फिरवला सामना, 60 चेंडूत 76 धावांची केली भागीदारी
या सामन्यात रविचंद्रन अश्विन महाग गोलंदाज ठरला.
ऑस्ट्रेलियात खेळल्या जात असलेल्या T20 विश्वचषक 2022 च्या तिसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. सुपर-12 च्या महत्त्वपूर्ण सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा (IND vs SA) 5 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 133 धावा करता आल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने एडन मार्कराम (52) आणि डेव्हिड मिलर (57) यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे दोन चेंडू बाकी असताना 5 बाद 137 धावा करून सामना जिंकला. या सामन्यात रविचंद्रन अश्विन महाग गोलंदाज ठरला त्याने 4 षटकात 43 धावा दिल्या आणि याचाच फायदा मिलर-मार्करामने घेतला. शेवटच्या 19व्या षटकात मिलर ने अश्विनला दोन षटकार मारुन सामना आपल्याकडे फिरवला.
मिलर-मार्करामने केली भागीदारी
डेव्हिड मिलर आणि एडन मार्कराम यांनी 60 चेंडूत 76 धावांची भागीदारी करत भारताकडून सामना हिरावून घेतला. या दोघांनी दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 24/3 वरून 100/4 वर नेला. मिलरने 46 चेंडूत 59 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचवेळी मार्करामने 41 चेंडूत 52 धावा केल्या. यादरम्यान मार्करामला दोन जीवदान मिळाले आणि त्याचा फायदा उठवत त्याने सामन्याला कलाटणी दिली. (हे देखील वाचा: IND vs SA: केएल राहुलचा फ्लॉप शो सुरूच, सोशल मीडियावर मीम्सचा महापूर)
खराब क्षेत्ररक्षण
कोहलीने 12व्या षटकातील पाचव्या चेंडूवर 35 धावांवर मार्करामचा सोपा झेल सोडला. यानंतर रोहित शर्माने 13व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मार्करामला धावबाद करण्याची संधी सोडली. यावेळी तो 36 धावांवर खेळत होता. 15व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मार्करामने लेग साइडला शॉट खेळला. चेंडू बराच वेळ हवेत होता, मात्र विराट आणि हार्दिक यांच्यात चेंडू पडला. तीन जीवदान मिळाल्यानंतर मार्कराम 41 चेंडूत 52 धावा करून बाद झाला. या सामन्यात भारताने विकेट घेण्याच्या अनेक संधी गमावल्या.