जसप्रीत बुमराह याच्यावर राहुल द्रविड नाराज? NCA मध्ये टेस्ट घेण्यास दिला नकार, जाणून घ्या कारण

बुमराहच्या या कारवाईमुळे एनसीएचे प्रमुख आणि माजी कर्णधार राहुल द्रविड खूप नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

राहुल द्रविड-जसप्रीत बुमराह (Photo Credit: Getty Images)

टीम इंडियाचा यॉर्कर स्पेशलिस्ट जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याला वेस्ट इंडिजविरुद्ध टेस्ट मालिकेदरम्यान दुखापत झाल्याने त्याला भारताच्या घरच्या मैदानावरील मालिका मुकाव्या लागल्या. विंडीज दौऱ्यावर त्याला दुखापत झाली होती. नुकताच तो विशाखापट्टणममध्ये भारतीय संघासोबत (Indian Team) होता. बुमराह नेट्समध्ये गोलंदाजीही करताना दिसला. भारतीय खेळाडू फिट होण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (National Cricket Academy), बंगळुरूमध्ये जातात. पण, बुमराहने तेथे जाण्यास नकार दिला आणि तो आपल्या वैयक्तिक प्रशिक्षकासह काम करत होता आणि आता तो पूर्ण तंदुरुस्त आहे. एनसीएवर काही काळापासून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रिद्धिमान साहा आणि भुवनेश्वर कुमार यांची तिथे जाऊन दुखापत अजून वाढली. आणि या कारणामुळे बुमराहने एनसीएमध्ये जाण्यास नकार दिला. बुमराहच्या या कारवाईमुळे एनसीएचे प्रमुख आणि माजी कर्णधार राहुल द्रविड (Rahul Dravid) खूप नाराज असल्याचे म्हटले जात आहे आणि त्यांनी बुमराहची टेस्ट करून त्याला फिट असल्याचे प्रशस्तीपत्र देण्यास मनाई केली.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार बुमराह फिटनेस टेस्ट करण्यासाठी बंगळुरूला पोहचला होता. पण, तिथे बुमराहला नम्रपणे सांगण्यात आले की, "तुम्ही ठीक आहात म्हणून फिटनेस टेस्टची गरज नाही. आपण कार्य करीत असलेल्या तज्ञांकडे जावे." द्रविडचे मत सोप्या युक्तिवादावर आधारित होती की "जर एनसीएने बुमराहवर उपचार केले नाहीत तर ते त्याला खेळायला योग्य आहे असे प्रमाणपत्र कसे देईल? एनसीएला ज्याची माहिती नसेल त्याचे प्रमाणपत्र ते कसे देऊ शकते?

दरम्यान, बुमराह पुढील वर्षी ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यावरील वनडे मालिकेतून पुनरागमन करणार असल्याचे समजले जात आहे.पण, सध्या तो फिट असल्याचे प्रमाणपत्र मिळवावे यासाठी प्रयत्नशील आहे.ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 14 जानेवारीपासून सुरु होणार आहे. परंतु, त्याआधी भारतीय संघ श्रीलंकाविरुद्ध 5 जानेवारीपासून 3 सामन्यांची टी-20 खेळणार आहे.