भारतीय क्रिकेटपटूच्या मुलीला बलात्काराची धमकी देणाऱ्या व्यक्तीस हैद्राबाद येथून अटक
शमीच्या धर्मावर निशाणा साधत काही यूजर्सनी त्याला देशद्रोही संबोधले. नंतर एक भारतीय क्रिकेटपटू शमीच्या समर्थनार्थ समोर आला होता
पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 विश्वचषक सामन्यात भारताच्या पराभवानंतर एका भारतीय क्रिकेटपटूच्या मुलीवर बलात्कार (Rape) करण्याची धमकी देणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने (Mumbai Police Cyber Cell) या व्यक्तीला हैदराबाद (Hyderabad) येथून अटक केली आहे. रामनागेश अलीबथिनी (23) असे या व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पाकिस्तानकडून सामना हरल्यानंतर या व्यक्तीने सोशल मिडियावर क्रिकेटपटूच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. पोलीस त्याला मुंबईत आणत आहेत.
आरोपी रामनागेश हा सॉफ्टवेअर इंजिनीअर असून तो पूर्वी फूड डिलिव्हरी अॅपसाठी सॉफ्टवेअर बनवत असे. टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर एक क्रिकेटपटू आणि त्याच्या कुटुंबाला धमक्या आल्या होत्या. ट्विटरवरील एका अनोळखी अकाऊंटवरून या क्रिकेटपटूच्या मुलीला बलात्काराची धमकी मिळाली आहे. ज्या अकाऊंटवरून हे ट्विट करण्यात आले ते डिलीट करण्यात आले आहे.
अशा बलात्काराच्या धमक्या मिळाल्याची दखल दिल्ली महिला आयोगानेही घेतली होती. दिल्ली महिला आयोगाने पोलिसांना नोटीस पाठवली होती. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी ही घटना अत्यंत लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे. स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना नोटीस देताना आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली होती. अखेर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. (हेही वाचा: बायको गर्भवती असल्याने शारीरिक संबंध थांबले; Sex साठी चटावलेल्या नराधमाचा 3 अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीची हत्या)
दरम्यान, आयसीसी टी-20 विश्वचषक 2021 मध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानविरुद्ध 10 विकेटने पराभव झाल्यानंतर मोहम्मद शमी क्रिकेट चाहत्यांच्या निशाण्यावर होता. शमीच्या धर्मावर निशाणा साधत काही यूजर्सनी त्याला देशद्रोही संबोधले. नंतर एक भारतीय क्रिकेटपटू शमीच्या समर्थनार्थ समोर आला होता. त्यालाही सोशल मीडियावर लक्ष्य केले गेले. एवढेच नाही तर या क्रिकेटपटूच्या मुलीला बलात्काराची धमकी मिळाली.