IPL Auction 2025 Live

'ग्रेनेड, रॉकेट लाँचर फेकले', श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने सांगितला पाकिस्तानमधील 2009 हल्ल्याचा थक्क करणारा अनुभव

क्रिकेट विश्वाने पाहिल्या गेलेल्या भयानक दहशतवादी घटनांपैकी एक होता. लाहोरमध्ये हल्ला झाला तेव्हा बसमध्ये असलेल्या श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने त्या घटनेच्या थक्क करणाऱ्या आठवणी सांगितल्या.

श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा (Photo Credit: Getty)

2009 मध्ये लाहोरमध्ये (Lahore) श्रीलंकेच्या टीम (Sri Lanka Team) बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण विश्वाला हादरून टाकले होते. क्रिकेट विश्वाने पाहिल्या गेलेल्या भयानक दहशतवादी घटनांपैकी एक होता. लाहोरमध्ये हल्ला झाला तेव्हा बसमध्ये असलेल्या श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने (Kumar Sangakkara) त्या घटनेच्या थक्क करणाऱ्या आठवणी सांगितल्या. ज्यावेळी त्यांच्या जीवनातील भीषण घटना घडली तेव्हा श्रीलंकन खेळाडू पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळासाठी गद्दाफी स्टेडियमच्या (Gaddafi Stadium) दिशेने निघाले होते. त्यांच्या बसवर 12 बंदूकधार्‍यांनी हल्ला केला. संगकाराने स्काय स्पोर्ट्सशी संभाषणादरम्यान तब्बल 11 वर्षांनंतर त्या हल्ल्याबद्दलचा अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला. संगाकाराने सांगितलं की कशा प्रकारे बसमधील एकाने बॉम्ब पडला तर बरं होईल, आपल्याला घरी तरी जाता येईलअसा विनोद केला. संगकारा म्हणाला, “सकाळच्या वेळी आम्ही जेव्हा बसमधून निघाले, तेव्हा आमच्या नेहमीच्या गप्पा सुरू होत्या. आज संध्याकाळी खेळ संपल्यानंतर काय करणार याबद्दल प्रत्येक जण सांगत होता. आमच्यातला एका वेगवान गोलंदाज म्हणाला की इथल्या खेळपट्ट्या एकदम सपाट आहेत, त्यामुळे मला तर संध्याकाळी हाताला फॅक्चर बँडेज बांधावं लागणार आहे. एखादा बॉम्ब पडला तर बरं होईल, आपल्याला घरी तरी जाता येईल. तो हे म्हणाला आणि अवघ्या 20 सेकंदानंतर आमच्यावर हल्ला झाला.” (वर्ल्ड कप 2011 फायनलमध्ये टॉसवरून झाला मोठा वाद, एमएस धोनीने दुसऱ्यांदा करण्याच्या मागणीचा कुमार संगकाराने सांगितला किस्सा)

त्या हल्ल्याचे वर्णन करताना संगकारा म्हणाला,“आमच्या सहकारी वर्गातील एक कर्मचारी बसमध्ये अगदी पुढेच बसला होता. आम्ही गोळीबाराचा आवाज ऐकला, तेव्हा आम्हाला वाटलं की फटाके वाजवत आहेत. तेवढ्यात तो कर्मचारी जोरात ओरडला की सगळ्यांनी खाली लपा, ते आपल्यावर गोळ्या झाडात आहे. दिलशान पण पुढे बसला होता. मी बसच्या मध्यभागी होतो. महेला जयवर्धने आणि मुरलीधरन माझ्या मागे बसले होते आणि समरवीरा माझ्या बाजूला होता, तर थरंगा परणविताना पुढे होता. आम्ही सगळे बसच्या खालच्या बाजूला लपलो. त्या हल्लेखोरांनी बसवर यथेच्छ गोळीबार केला, ग्रेनेड फेकले, रॉकेट लाँचरचा पण हल्ला चढवला. पण सुदैवाने आम्ही सारे वाचलो. आमच्यातील समरवीरा, मी आणि मेंडिस तिघेही जखमी झालो होतो. परणवितानाच्या छातीतून रक्त वाहत होतं. तो खाली कोसळला आणि म्हणाला की त्याला गोळी लागली आहे. हल्लेखोराने बस ड्रायव्हरला मारायचा प्रयत्न केला, पण तो ड्रायव्हर हिरो ठरला. त्याने या सगळ्यातून आम्हाला कसेबसे बाहेर नेले. दुर्दैवाने, आमचे रक्षण करणारे बहुतेक सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आणि ते दुःखद होते.”

पहिला सामना ड्रॉ झाल्यावर दुसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत श्रीलंका 606 धावांसह आघाडीवर होते. पाकिस्तानने दुसऱ्या दिवसाखेर 110 धावांवर 1 विकेट गमावली होती. आणि तिसऱ्या दिवसाचा खेळासाठी स्टेडियमच्या दिशेने जाणाऱ्या श्रीलंकाई टीमवर हल्ल्याने सर्वांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. क्रिकेट इतिहासातील काळ्या दिवसांपैकी एक असे त्या दिवसाचे वर्णन आजही केले जाते.