IND vs BAN 1st Test 2022 Day 2: कुलदीपची फिरकी आणि सिराजचा वेग, बांगलादेशच्या फलंदाजांची प्रत्येक योजना गेली वाया
सामन्याच्या पहिल्या दिवसाचे पहिले सत्र वगळता उर्वरित 5 सत्रांमध्ये भारतीय संघाने खेळाच्या प्रत्येक विभागात बांगलादेशवर वर्चस्व राखले.
IND vs BAN 1st Test: टीम इंडियाने मालिकेतील पहिल्या कसोटीत बांगलादेशवर आपली पकड पूर्णपणे घट्ट केली आहे. चट्टोग्राममध्ये दोन दिवसांच्या खेळानंतर भारत ज्या टप्प्यावर पोहोचला आहे, तिथून तो फक्त आणि फक्त विजय पाहत असावा. भारताविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्ये पहिला विजय नोंदवण्यासाठी बांगलादेशला आणखी वेळ वाट पाहावी लागणार हे या सामन्याचे आतापर्यंतचे संकेत स्पष्ट झाले आहेत. सामन्याच्या पहिल्या दिवसाचे पहिले सत्र वगळता उर्वरित 5 सत्रांमध्ये भारतीय संघाने खेळाच्या प्रत्येक विभागात बांगलादेशवर वर्चस्व राखले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने 8 बाद 133 धावा केल्या असून फॉलोऑन वाचवण्यासाठी त्यांना 72 धावांची गरज आहे.
कुलदीप-सिराजचा बांगलादेश फलंदाजांना दणका
भारतीय संघाचा पहिला डाव 404 धावांवर संपला. याला बांगलादेशने पहिल्याच चेंडूवर विकेट गमावून प्रत्युत्तर दिले. मोहम्मद सिराजने पहिल्याच चेंडूवर नजमुल हुसेन शांतोला गोल्डन डकवर बाद केले. भारतीय गोलंदाजांनी यजमानांना त्यांच्या डावात स्थिरावण्याची संधीच दिली नाही. बांगलादेशला लागलेल्या पहिल्या 4 धक्क्यांपैकी सिराजने एकट्याने 3 बळी घेतले. चायनामन कुलदीप यादव आक्रमणात आल्यावर त्याने संपूर्ण सामना हायजॅक केला. 22 महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या कुलदीपने पहिल्याच षटकात विकेटची चव चाखली. त्याने बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसनला आपला पहिला बळी बनवला. कुलदीपने खेळाच्या दुसऱ्या दिवशी 10 षटकांत 33 धावा देत सर्वाधिक 4 बळी घेतले. (हे देखील वाचा: Video: लिटन दासने सिराजसोबत घेतला पंगा, पुढच्या चेंडूवर सिराजने उडवला दांडा, विराटने केल खास सेलिब्रेशन (पहा व्हिडीओ)
बांगलादेशच्या फलंदाजांनी आतापर्यंत ज्याप्रकारे कामगिरी केली आहे, ते पाहता फॉलोऑनमधून त्यांची सुटका ही चमत्कारापेक्षा कमी असणार नाही. यजमान संघ फॉलोऑन खेळतो की नाही हे टीम इंडियाच्या थिंक टँकच्या निर्णयावर अवलंबून असेल. अलीकडच्या काळात, टीम इंडियाने विरोधी संघांना फॉलोऑन न देण्याची परंपरा केली आहे, परंतु चट्टोग्रामच्या वेगवान खेळपट्टीवर, भारतीय कर्णधार केएल राहुल आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ही परंपरा खंडित करू शकतात.