देव विसरले आणि जगाला बोलावले; ICC World Cup 2023 Final सामन्यातील निमंत्रणावरुन माजी कर्णधाराची नाराजी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी निमंत्रण नव्हते असा दावा भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपील देव यांनी केला आहे.

Kapil Dev & Cricket World Cup 2023 | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Kapil Dev News: अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर पार पडलेल्या आयसीसीसी पुरुष विश्वचषक 2023 च्या अंतिम सामन्यासाठी ( ICC World Cup 2023 Final India vs Australia) जगभरातील मान्यवरांना निमंत्रीत करण्यात आले होते. भारतातीलही क्रिकेटशी संबंधीत असलेल्या आणि नसलेल्या आजी-माजी पदाधीकारी, नेते आणि सेलीब्रेटींना या सामन्यांचे निमंत्रण धाडण्यात आले होते. मात्र, या सर्वात भारताला पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक मिळवून देणाऱ्या माजी कर्णधार कपील देव (Kapil Dev) यांची उपस्थिती कोणालाच दिसली नाही. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा होती. दरम्यान, या अनुपस्थितीचे नेमके कारण माजी कर्णधाराने दिले आहे. ज्यामुळे अंतिम सामन्याचे आयोजन आणि निमंत्रण यावरुन बरेच मानापमाननाट्य घडल्याची चर्चा क्रीडावर्तुळात सुरु झाली आहे.

1983 मध्ये भारत पहिल्यांदा विश्वविजेता

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपील देव यांनी दावा केला आहे की, 19 नोव्हेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी त्यांना आयोजकांकडून निमंत्रणच मिळाले नाही. संपूर्ण विश्वाला माहिती आहे की, एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत सन 1983 मध्ये भारताने दमदार विजय मिळवला होता. देशाच्या इतिहासामध्ये प्रथमच विश्वचषकावर भारताचे नाव कोरले गेले होते. ही किमया केली होती, कपील देव आणि त्यांच्या संघाने. त्यामुळे जर भारतामध्ये आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले गेले असेल तर त्यांना निमंत्रीत करणे क्रमप्राप्त होते, अशी क्रीडा क्रीडा रसिकांची भावना आहे. पण, तसे घडले नाही.

1983 ची विश्वचषक विजेत्या संघास निमंत्रण नाही

कपील देव यांनी म्हटले आहे की, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी मला निमंत्रित करण्यात आले नव्हेत. आयोजकांकडून तस पत्र, फोन अथवा कोणताही संदेश मिळाला नाही. त्यामुळे आपण तेथे गेलो नाही. माझी अशी इच्छा होती की, केवळ मीच नव्हे तर माझ्यासोबत विश्वचषक जिंकलेली 1983 ची संपूर्ण टीम तिथे माझ्यासोबत असायला हवी होती. पण, असे घडले नाही. जेव्हा मोठा कार्यक्रम असतो तेव्हा, लोक आपापल्या कामात व्यग्र असतात. त्यामुळे कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी विसरल्या जाता, असा टोलाही त्यांनी आयोजकांना लगावला. एबीपी न्यूज सोबत बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार राहिलेले अनेक माजी खेळाडू, क्रिकेटपटू अंतिम सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडीयमवर उपस्थित होते. ज्यात बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगूलीचाही समावेश होता. उल्लेखनीय असे की, अशा कार्यक्रमांना बीसीसीआयच्या सर्व माजी अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांना निमंत्रीत करण्याचा संकेतही आहे. तरीसुद्धा कपील देव यांच्याबाबत ही बाब घडली.