सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण नव्हे तर भारताचा वर्ल्डकप विजेता कर्णधार करणार मुख्य प्रशिक्षक आणि स्टाफची निवड
देव यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली तीन सदस्यी 'क्रिकेट सल्लागार समिती' भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक आणि अन्य सदस्यांची निवड करतील.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि साहाय्यक स्टाफचा बीसीसीआय (BCCI) सोबतचा करार आता संपला आहे. पण टीम इंडियाच्या आगामी वेस्ट इंडिज (West Indies) दौर्याचा विचार करता भारतीय क्रिकेट बोर्डने त्यांना 45 दिवसांची मुदत वाढ करून दिली आहे. यावेळेत बीसीसीआय संघाचे प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफची नव्याने नेमणूक करणार आहे. यासाठी अर्ज देखील मागवण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जुलै आहे. पण यावेळी मुख्य प्रशिक्षक आणि साहाय्यक स्टाफची निवड विश्वकप विजेता कर्णधार कपिल देव करणार आहे. देव यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली तीन सदस्यी 'क्रिकेट सल्लागार समिती' (Cricket Advisory Committee) भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक आणि अन्य सदस्यांची निवड करतील. (BCCI कडून टीम इंडिया च्या मुख्य प्रशिक्षकासाठी वयाची अट, किमान दोन वर्षांचा आंतरराष्ट्रीय अनुभव असावा)
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीनं तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीचे प्रमुख हे देव असतील. त्यांच्यासह अंशुमन गायकवाड (Anshuman Gaekwad) आणि शांथा रंगस्वामी (Shantha Rangaswamy) हे देखील या समितीचे सदस्य आहेत. दरम्यान, याआधी नेमलेल्या सल्लागार समितीत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), सौरव गांगुली (Sourav Ganguly)आणि व्ही व्ही एस लक्ष्मण (VVS Laxman) यांचा समावेश होता, पण नंतर ही समिती बरखास्त करण्यात आली होती.
दुसरीकडे, बीसीसीआयने नवीन प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले आहेत आणि या पदासाठी तीन मुख्य अटी ठेवल्या आहेत. मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 60 वर्षांखाली असावे आणि त्याला दोन वर्षांचा आंतरराष्ट्रीय संघाला मार्गदर्शन केल्याचा अनुभव असावा अशी अटही घालण्यात आली आहे.