Kane Williamson Century: हॅमिल्टनमध्ये केन विल्यमसनच्या बॅटमधून विक्रमी शतक, इंग्लंडविरुद्ध केला विश्वविक्रम

हा किवी फलंदाज तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 156 धावांवर बाद झाला. अशाप्रकारे बघितले तर हॅमिल्टनचे सेडन पार्क विल्यमसनसाठी शुभ ठरले आहे.

Kane Williamson (Photo Credit - X)

NZ vs ENG 3rd Test 2024: न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनने सोमवारी इंग्लंडविरुद्ध नवा इतिहास रचला आहे, जिथे त्याने हॅमिल्टनमध्ये दमदार शतक झळकावून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. या सामन्यात शतक पूर्ण करून, विल्यमसन कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात एकाच मैदानावर सलग पाच सामन्यांमध्ये शतक ठोकणारा पहिला क्रिकेटपटू ठरला. हॅमिल्टन येथील सेडॉन पार्कमध्ये त्याने ही कामगिरी केली. हा किवी फलंदाज तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 156 धावांवर बाद झाला. अशाप्रकारे बघितले तर हॅमिल्टनचे सेडन पार्क विल्यमसनसाठी शुभ ठरले आहे. या सामन्यापूर्वी त्याने या मैदानावर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध 200 धावा, 2019 मध्ये इंग्लंडविरुद्ध 104 धावा, 2020 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 251 धावा आणि यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 133* धावा केल्या होत्या.

विल्यमसनने झळकावले 33 वे शतक

कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी, विल्यमसनने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात आपले 33 वे कसोटी शतक पूर्ण केले. त्याने खास षटकार मारून आपले शतक पूर्ण केले. यासह, विल्यमसन विशिष्ट मैदानावर 100 पेक्षा जास्त सरासरी असलेल्या खेळाडूंच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या मार्गावर आहे.

डॉन ब्रॅडमन टाॅपवर

आतापर्यंत कोणत्याही एका मैदानावर 100 पेक्षा जास्त सरासरीने धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा डॉन ब्रॅडमन अव्वल आहे, त्यांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 128.53 च्या जोरदार सरासरीने धावा केल्या आहेत. भारताचा व्हीव्हीएस लक्ष्मण या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे, त्याने कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर 110.63 च्या सरासरीने धावा करण्याचा विक्रम केला आहे. बार्बाडोसमधील किंग्स्टन ओव्हलवर 104.15 च्या सरासरीने धावा करणाऱ्या कोणत्याही एका मैदानावर 100 पेक्षा जास्त सरासरीने धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये गारफिल्ड सोबर्सचे नाव देखील समाविष्ट आहे.

विल्यमसनचा विशेष यादीत समावेश

या शतकाच्या जोरावर विल्यमसन आता एकाच मैदानावर सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. या बाबतीत त्याने मायकेल क्लार्क (ॲडलेड), जो रूट (लॉर्ड्स) आणि महेला जयवर्धने (गॉल) या महान खेळाडूंची बरोबरी केली आहे. विल्यमसनपेक्षा फक्त जयवर्धने (11, कोलंबो एसएससी), ब्रॅडमन (9, मेलबर्न), जॅक कॅलिस (9, केपटाऊन) आणि कुमार संगकारा (8, कोलंबो एसएससी) यांनी एकाच मैदानावर अधिक शतके झळकावली आहेत.