IPL 2022: आयपीएल मधील 33 सामन्यांनंतर कोण आहे ‘सिक्सरमशीन’, ‘या’ धुरंधरानी मारलेत सर्वाधिक षटकार; टॉप-5 मध्ये विदेशी फलंदाजांचे अधिराज्य
आयपीएल टी-20 लीगमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही बॅट आणि बॉलचा थरारक सामना पाहायला मिळत आहे. या दरम्यान प्रत्येक सामन्यात खेळाडूंकडून चौकार आणि षटकारांची बरसात होत आहे. आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमधला 'सिक्सर किंग' कोण आहे आणि टॉप-10 फलंदाज कोण आहेत हे आज आपण जाणून घेऊया.
IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामाचा रोमांच आता शिगेला पोहोचला आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात 21 एप्रिलपर्यंत एकूण 33 सामने खेळले गेले आहेत. आयपीएल (IPL) टी-20 लीगमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही बॅट आणि बॉलचा थरारक सामना पाहायला मिळत आहे. एकीकडे मुंबई आणि चेन्नई, आयपीएलचे दोन सर्वात यशस्वी संघ लय मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत. तर दोन नवीन फ्रँचायझी - गुजरात आणि लखनौ यांनी प्रभावी सुरुवात केली. परिणामी दोन्ही नवीन संघ प्लेऑफच्या शर्यतीत उतरले आहेत. याशिवाय युवा खेळाडूंप्रमाणे अनुभवी खेळाडूंनी देखील प्रभाव पाडला आहे. या दरम्यान काही फलंदाजांनी बॅटने गोलंदाजांवर हल्लाबोल केला आहे. प्रत्येक सामन्यात खेळाडूंकडून चौकार आणि षटकारांची बरसात होत आहे. आत्तापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमधला 'सिक्सर किंग' कोण आहे आणि टॉप-10 फलंदाज कोण आहेत हे आज आपण जाणून घेऊया. (IPL 2022, DC vs RR: शिमरॉन हेटमायरला यॉर्कर बॉलिंग स्लिंगा मलिंगाने केले हैराण, विंडीज पॉवरहीटरने श्रीलंका दिग्ग्जवर असा केला पलटवार Watch Video)
1. जोस बटलर (Jos Buttler)
आयपीएलचा सध्याचा ऑरेंज कॅप धारक आणि राजस्थान रॉयल्सचा तडाखेबाज सलामीवीर जोस बटलर फक्त धावा करण्यातच नाही तर चौकार-षटकरांची आतषबाजी करण्यातही आघाडीवर आहे. बटलरने आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यात गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आणि एकूण 23 षटकार खेचले आहेत.
2. शिमरॉन हेटमायर (Shimron Hetmyer)
बटलरच्या पाठोपाठ त्याचा राजस्थान रॉयल्सचा आक्रमक फलंदाज शिमरॉन हेटमायर यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. हेटमायरने 6 सामन्यात एकूण 17 सिक्स मारले आहेत. हेटमायर सध्या राजस्थान रॉयल्सचा मधल्या फळीतील विश्वासू फलंदाज आहे.
3. लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone)
पंजाब किंग्स संघासाठी आतापर्यंत धमाकेदार कामगिरी करणारा इंग्लंडचा माजी फलंदाज लियाम लिविंगस्टोनने या यादीत तिसरे स्थान काबीज केले आहे. लिविंगस्टोनने 7 सामन्यात 16 षटकार खेचले आणि 226 धावा केल्या आहेत.
4. आंद्रे रसेल (Andre Russell)
कोलकाता नाईट रायडर्सचा धडाकेबाज अष्टपैलू आंद्रे रसेल बॅटने धावा करून आतापर्यंत फारसे योगदान देऊ शकलेला नाही. पण षटकरांची आतषबाजी करण्यात विंडीजचा हा स्टार क्रिकेटपटूही मागे राहिला नाही. रसेलने लिविंगस्टोन प्रमाणरे 7 सामन्यात एकूण 16 षटकार मारले आहेत.
5. दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून यंदाचा हंगाम गाजवणारा दिनेश कार्तिकही या यादीत सामील आहे. आरसीबीचा स्टार फिनिशर यंदा आपल्या तुफान फलंदाजीमुळे प्रकाश झोतात आला आहे. कार्तिकने मैदानात चौफेर फटकेबाजी केली आणि 7 सामन्यात 15 सिक्स खेचले आहेत. बेंगलोर संघासाठी अशी करामात करणारा तो आघाडीचा फलंदाज आहे.
दुसरीकडे, वरील खेळाडूंशिवाय टॉप-10 खेळाडूंमध्ये चेन्नईचे शिवम दुबे आणि रॉबिन उथप्पा तर अजूनही विजयाची चव न चाखलेल्या मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादवचा देखील समावेश आहे. याशिवाय राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि सनरायझर्स हैदराबादच्या राहुल त्रिपाठी देखील टॉप-10 मध्ये आहेत.