IPL 2022: आयपीएलच्या सुरुवातीलाच चमकले ‘हे’ 5 भारतीय देशांतर्गत खेळाडू, भविष्यात टीम इंडियात स्थान मिळवण्याचे बनू शकतात दावेदार
दरवेळेप्रमाणेच या वेळी देखील भारतीय युवा प्रतिभांनी सुरुवातीपासूनच आपला दम दाखवण्यास सुरुवात केली आहे. आयपीएलच्या व्यासपीठावरून देशांतर्गत खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळते. अशा परिस्थितीत यंदाही अनेक युवा खेळाडू सुरुवातीपासूनच चर्चेत आले आहेत.
IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 15 सीझनची धमाकेदार सुरुवात झाली आहे आणि आधीच काही अटीतटीचे सामन्यांचा चाहत्यांनी आनंद लुटला आहेत. विशेष म्हणजे टीम रोस्टर्समधून आतापर्यंत काही मोठी नावे गायब असल्याने अनकॅप्ड खेळाडू आणि युवा खेळाडू संघाच्या विजयासाठी या प्रसंगी पुढे सरसावले आहेत. दरवेळेप्रमाणेच या वेळी देखील भारतीय युवा प्रतिभांनी सुरुवातीपासूनच आपला दम दाखवण्यास सुरुवात केली आहे. आयपीएल (IPL) हे एक व्यासपीठ आहे जिथे भारतीय देशांतर्गत खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळते. ईशान किशन, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांसारख्या खेळाडूंनी या लीगमध्ये कामगिरी करून टीम इंडियामध्ये (Team India) स्थान मिळवले आहे. अशा परिस्थितीत यंदाही असे अनेक युवा खेळाडू आहेत जे सुरुवातीपासूनच चर्चेत आहेत. (IPL मध्ये षटकारांची आतषबाजी करण्यात ‘हा’ संघ पटाईत; तर MS Dhoni आहे 20व्या षटकाचा सिकंदर, पोलार्ड आणि ‘हिटमॅन’ रोहित शर्माही मागे नाही)
ललित यादव (दिल्ली कॅपिटल्स)
ललित यादव (Lalit Yadav) याने दिल्ली कॅपिटल्सला (Delhi Capitals) मुंबई इंडियन्सविरुद्ध आपल्या पहिल्या सामन्यात विजयी मोहिमेत 48 धावांची नाबाद खेळी केली. आव्हानात्मक 178 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची 10 षटकांत 72/5 अशी स्थिती झाली, परंतु दिल्लीचा अष्टपैलू यादवने आपल्या 38 चेंडूत नाबाद खेळी करून संयमी खेळी केली. यादवने आपल्या खेळीत चार चौकार आणि दोन षटकार खेचले आणि अक्षर पटेलच्या साठी सातव्या विकेटसाठी 30 चेंडूत 75 धावांची मॅच-विनिंग खेळी केली.
बसील थंपी (मुंबई इंडियन्स)
केरळचा वेगवान गोलंदाज बसील थंपीने (Basil Thampi) शनिवारी मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली. आगामी सामन्यांमध्येही असेच काहीसे करण्याची आशा थंपीला असेल. दिल्लीविरुद्ध कर्णधार रोहित शर्माने थंपीवर विश्वास दाखवला आणि तो त्याने पूर्णपणे खरा ठरवला. थंपीने पृथ्वी शॉ, रोवमन पॉवेल आणि शार्दुल ठाकूर यांच्या 3 महत्त्वाच्या विकेट घेतल्या.
आयुष बडोनी (लखनऊ सुपर जायंट्स)
लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) हा 22 वर्षीय फलंदाज गेल्या सामन्यात चर्चेचा विषय ठरला होता. केएल राहुल, क्विंटन डी कॉक, एव्हिन लुईस आणि मनीष पांडे या बड्या खेळाडूंना बाद केल्यानंतर आयुषने आयपीएलच्या पहिल्या सामन्यात 4 चौकार आणि तीन षटकारांसह 41 चेंडूत अर्धशतक ठोकले. यादरम्यान आयुषने 54 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळून संघाची धावसंख्या 150 च्या पार नेण्यात महत्वाची भूमिका बजावली.
आकाश दीप (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
आकाश दीप (Akash Deep) RCB साठी KKR विरुद्धच्या दुसर्या सामन्यात बॉलसह स्टार परफॉर्मर्स राहिला. त्याने 45 धावांत तीन बळी घेतले. त्याने वेंकटेश अय्यर आणि नितीश राणा यांच्या मोठ्या विकेट मिळवल्या. पण पंजाब किंग्ज (पीबीकेएस) विरुद्ध पहिल्या सामन्यात त्याची फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली असली तरी, 25 वर्षीय खेळाडूने दाखवून दिले की केकेआर विरुद्ध त्याचे शॉर्ट-बॉल कौशल्य कार्यान्वित करण्यासाठी आत्मविश्वासाने भरपूर आहे.
शेल्डन जॅक्सन (कोलकाता नाईट रायडर्स)
कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) यष्टिरक्षक-फलंदाज शेल्डन जॅक्सनने (Sheldon Jackson) आपल्या चोख विकेटकीपिंगने सर्वांना प्रभावित केले आहे. ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरने स्वतः या खेळाडूचे कौतुक केले. जॅक्सन याने विकेटच्या मागे चपळता दाखवली परंतु आतापर्यंत तो बॅटने फारसे काही करू शकला नाही. अशा परिस्थितीत शेल्डनला टीम इंडियात स्थान मिळवायचे असेल तर त्याला ऋषभ पंत आणि ईशान किशन यासारख्या युवा तुफानी फलंदाजांशी स्पर्धेला सामोरे जावे लागेल. त्यामुळे त्याला त्याच्या फलंदाजीवर काम करावे लागेल. जॅकसनची प्रथम श्रेणीत सरासरी 50 पेक्षा जास्त आहे. मात्र, त्याला अद्याप भारताकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही.