IPL 2022: आयपीएलमध्ये सलग सहा सामन्यांमध्ये पराभवाची नामुष्की, मुंबई इंडियन्स आणि आणखी दोन संघांच्या नावे ही कामगिरी

लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या गेल्या सामन्यात मुंबईला विजयासाठी 18 धावा कमी पडल्या आणि संघाने सलग सहावा सामना गमावला. शिवाय, आयपीएलच्या (IPL) संपूर्ण इतिहासात मुंबई इंडियन्सला एका हंगामाच्या सुरुवातीला सलग सहा पराभव पत्करावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) इतिहासातील सर्वात यशस्वी फ्रँचायझी मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात खराब सुरुवात केली आहे. लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्धच्या गेल्या सामन्यात मुंबईला विजयासाठी 18 धावा कमी पडल्या आणि संघाने सलग सहावा सामना गमावला. शिवाय, आयपीएलच्या (IPL) संपूर्ण इतिहासात मुंबईला एका हंगामाच्या सुरुवातीला सलग सहा पराभव पत्करावे लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. पण लक्षणीय आहे की एका हंगामातील पहिले सहा सामने गमावणारा मुंबई हा एकमेव संघ नाही, यापूर्वी देखील इतर दोन संघांनाही अशाच प्रकारच्या लज्जास्पद कामगिरीचा सामना करावा लागला आहे. हंगामाच्या शेवटी ते कुठे संपले हे जाणून घेऊ इच्छिता? अधिक माहितीसाठी खाली वाचा. (IPL 2022, MI vs LSG: सलग 6 पराभवाचे रोहित शर्माने फोडले स्वतःच्या डोक्यावर, सामन्यानंतर सांगितले चूक कुठे झाली; वाचा काय म्हणाला)

रोहित शर्माची ‘पलटन’ 2013 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) आणि 2019 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) नंतर आयपीएल हंगामातील पहिले सहा सामने गमावणारी तिसरी टीम आहे. पाच वेळच्या चॅम्पियन संघाने प्लेऑफसाठी पात्र होण्याची शक्यता आता अत्यंत धूसर दिसत आहे. पण गणितीयदृष्ट्या हे अद्याप शक्य आहे, परंतु हे फक्त रोहित आणि सहकाऱ्यांच्या पुनरागमनाने होईल. यापूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या दिल्ली कॅपिटल्सने 2013 मध्ये आयपीएल मोहिमेतील सर्वात वाईट सुरुवातीचा सामना केला होता. दिल्लीने त्यांचे सुरुवातीचे सहा सामने सलग गमावले होते आणि एकूण फक्त 3 जिंकण्यात यशस्वी ठरले होते. अशा परिस्थितीत नऊ संघांच्या गुणतालिकेत त्यावेळी दिल्लीला तळाशी, नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

दिल्लीनंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) फ्रँचायझी आयपीएल हंगामातील सर्वात खराब सुरुवात करणारा दुसरा संघ आहे. बेंगलोर संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वात 2019 हंगामातील सुरुवातीचे सहा सामने गमावले होते. त्यांनी साखळी टप्प्यांनंतर 14 पैकी फक्त 5 सामने जिंकून आठव्या क्रमांकावर आपली मोहीम संपुष्टात आणली होती. दुसरीकडे, आयपीएलच्या इतिहासातील सलग सहा सामने गमावणारा मुंबई इंडियन्स सातवा संघ ठरला आहे. मुंबई व्यतिरिक्त कोलकाता नाईट रायडर्स, पुणे वॉरियर्स, दिल्ली, पंजाब किंग्ज, डेक्कन चार्जर्स आणि आरसीबी यांनाही सहा सामने गमावण्याची नामुष्की सहन करावी लागली आहे.