IPL 2022, LSG vs CSK: मोईन अली याच्या पुनरागमनाने ‘या’ खेळाडूला दाखवला जाणार बाहेरचा रस्ता, चेन्नईच्या प्लेइंग XI मध्ये होणार मोठा बदल
आज सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ससाठी खुशखबर म्हणजे त्यांचा स्टार अष्टपैलू मोईन अली संघात परतला असून पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज आहे.
IPL 2022, LSG vs CSK: आयपीएल (IPL) 2022 चा 7 वा सामना आज लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघ आपला पहिला सामना गमावून येथे पोहोचले आहेत, अशा स्थितीत आज दोन्ही संघांच्या नजरा पॉइंट टेबलमध्ये आपले खाते उघडण्यावर असेल. सीझनच्या सुरुवातीच्या सामन्यात चेन्नईचा कोलकाता नाईट रायडर्सने पराभव केला होता, तर लखनऊला गुजरात टायटन्सने पराभूत केले होते. त्यामुळे आज सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. आजच्या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ससाठी खुशखबर म्हणजे त्यांचा स्टार अष्टपैलू मोईन अली (Moeen Ali) संघात परतला असून पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. (LSG vs CSK, Dream Team 11 Prediction IPL 2022: जडेजाच्या चेन्नईचा KL Rahul याच्या लखनऊशी सामना, हे ‘ड्रीम 11’ करून देईल बंपर कमाई)
व्हिसा संबंधित समस्यांमुळे मोईन भारतात उशिरा पोहोचला होता. याच कारणामुळे तो केकेआरविरुद्ध पहिला सामना खेळू शकला नाही. मोईनच्या जागी मिचेल सँटनरला संधी मिळाली होती, पण तो बॉलने काही कारनामा करू शकला नाही. अशा परिस्थितीत आता मोईनच्या संघातील प्रवेशामुळे मधली फळी मजबूत होईल, तसेच गोलंदाजीतही तो आपले पूर्ण योगदान देऊ शकेल. मोईन व्यतिरिक्त डेव्हन कॉन्वे, ड्वेन ब्रावो आणि एडम मिल्ने हे सीएसकेचे इतर तीन परदेशी खेळाडू असतील. चेन्नईचा स्टार वेगवान गोलंदाज दीपक चाहर याच्या अनुपस्थितीत तुषार देशपांडे संघाचा मुख्य भारतीय गोलंदाज असेल. पण गेल्या सामन्याप्रमाणेच गोलंदाजीची कमान अनुभवी ब्रावोच्या खांद्यावर असेल. तसेच मधल्या फळीत कर्णधार रवींद्र जडेजा, शिवम दुबे आणि एमएस धोनी यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. गेल्या सामन्यात जडेजा कर्णधाराच्या दबावात दिसला तर आघाडीच्या फलंदाजांच्या खराब कामगिरीनंतर धोनीने अखेरच्या षटकांत खेळीने संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
दुसरीकडे, गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात लखनऊची आघाडीची फळी पूर्णपणे अपयशी ठरली, पण खालच्या फळीतील फलंदाजांनी चमकदार कामगिरी करत संघाची धावसंख्या 150 पार नेले. याशिवाय गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. अशा परिस्थितीत केएल राहुलला एका सामन्यानंतर आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल न करण्याच्या विचारात असेल.