IPL 2022, CSK vs GT: ‘किलर’ मिलरने धुमाकूळ घातला, कर्णधार राशिदच्या साथीने चेन्नईचा खेळ बिघडवला, गुजरातचा विजयरथ सुसाट
IPL 2022, CSK vs GT: चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या आयपीएलच्या 28 व्या चुरशीच्या सामन्यात गुजरात टायटन्सने डेविड मिलरच्या ताबडतोड फलंदाजीच्या जोरावर तीन गडी राखून जोरदार विजयाची नोंद केली. अशाप्रकारे चेन्नईला स्पर्धेत पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला आहे तर गुजरातने दिमाखात पाचवा विजय मिळवला. टायटन्सकडून मिलरने सर्वाधिक नाबाद 94 धावांची खेळी केली.
IPL 2022, CSK vs GT: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super KIngs) विरुद्धच्या आयपीएलच्या 28 व्या चुरशीच्या सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) डेविड मिलरच्या (David Miller) ताबडतोड फलंदाजीच्या जोरावर तीन गडी राखून जोरदार विजयाची नोंद केली. अशाप्रकारे चेन्नईला स्पर्धेत पाचव्या पराभवाचा सामना करावा लागला आहे तर गुजरातने दिमाखात पाचवा विजय मिळवला. टायटन्सकडून मिलरने सर्वाधिक 51 चेंडूत 94 धावांची दमदार खेळी खेळली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 6 षटकार मारले. राशिद खानने (Rashid Khan) 40 धावांची झुंजार खेळी केली. चेन्नईने दिलेल्या 170 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात गुजरातने एक बॉल शिल्लक असताना दिमाखदार विजय मिळवला. चेन्नईने एकावेळी सामन्यावर वर्चस्व मिळवले होते, मिलरने गुजरातचा प्रभारी कर्णधार राशिदच्या साथीने सुपर किंग्सच्या आशेवर पाणी फेरले. यासह गुजरातने स्पर्धेत आपल्या पाचव्या विजयाची तर चेन्नईने पराभवाची नोंद केली आहे.
प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 5 गडी गमावून 169 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने अडखळत सुरु केली. गुजरातला मिळालेले 170 धावांचे लक्ष्य त्यांना अवघड पडल्याचे दिसले. शुभमन गिल आणि विजय शंकर खाते न उघडता पॅव्हिलियनमध्ये परतले. तर हंगामातील पहिलाच सामना खेळणारा रिद्धिमान साहा संथ खेळी करून स्वस्तात बाद झाला. अभिनव मनोहर देखील बॅटने या सामन्यात फारसे प्रभाव पाडण्यात अपयशी ठरला. तर गेल्या काही सामन्यात गुजरातकडून विजयी भूमिका बजावलेला राहुल तेवतिया देखील योगदान देण्यात अपयशी ठरला. यानंतर टोक धरून शानदार फलंदाजी करणाऱ्या डेविड मिलरला प्रभारी कर्णधार राशिद खानची मूल्यवान साथ मिळाली. दोंघांमधील अर्धशतकी भागीदारीने गुजरातच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या. क्रिस जॉर्डनच्या षटकांत 25 धावा काढल्या. गुजरात संघाकडून अभिनव मनोहरने 12 आणि रिद्धिमानस साहाने 11 धावा केल्या. याशिवाय अन्य फलंदाज एकेरी धावसंख्यावर बाद झाले.
शेवटच्या षटकात गुजरातला विजयासाठी 13 धावांची गरज होती. पहिल्या चेंडूवर मिलरला धाव घेता आली नाही तर दुसऱ्या चेंडूवरही धाव झाली नाही. पण तिसऱ्या चेंडूवर मिलरने षटकार ठोकला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर शिवम दुबेने मिलरचा अप्रतिम झेल घेतला पण चेंडू कमरेच्या वर गेल्याने नो बॉल देण्यात आला. मिलरने फ्री हिटवर चौकार खेचला. आणि अखेरीस मिलरने पाचव्या चेंडूवर दोन धावा घेत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. यापूर्वी नाणेफेक गमावून फलंदाजीला उतरलेल्या चेन्नईची सुरुवात अत्यंत खराब झाली. पॉवरप्लेमध्ये संघाने दोन गडी गमावले. त्यानंतर अंबाती रायडू 31 चेंडूत 46 धावा करून बाद झाला. तर गेल्या पाच सामन्यात खराब फॉर्ममध्ये टीकेचा सामना करणाऱ्या गायकवाडने 48 चेंडूत 73 धवनची महत्वपूर्ण खेळी केली. कर्णधार रवींद्र जडेजाने देखील संघाच्या धावसंख्येचा हातभार लावला आणि 12 चेंडूत नाबाद 22 धावा करून संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली.
(The above story first appeared on LatestLY on Apr 17, 2022 11:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

