IPL 2021, SRH vs PBKS: अखेरच्या षटकात पंजाबचा 5 धावांनी विजय, प्लेऑफ शर्यतीतून सनरायझर्स हैदराबादचा पत्ता कट
पंजाबने दिलेल्या 126 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात सनरायझर्स संघ 20 ओव्हरमध्ये 120 धावाच करू शकला. परिणामी संघाला 5 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयासह पंजाबने यंदाच्या आयपीएल प्लेऑफच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत.
IPL 2021, SRH vs PBKS: शारजाह (Sharjah) येथे झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पंजाब किंग्सने (Punjab Kings) अखेरच्या षटकात सनरायझर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) मात केली आणि शानदार विजय मिळवला. पंजाबने दिलेल्या 126 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात सनरायझर्स संघ 20 ओव्हरमध्ये 120 धावाच करू शकला. परिणामी संघाला 5 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयासह पंजाबने यंदाच्या आयपीएल प्लेऑफच्या (IPL Playoffs) आशा पल्लवित ठेवल्या आहेत. पंजाबचा 10 सामन्यातील हा चौथा विजय ठरला. हैदराबादकडून जेसन होल्डर (Jason Holder) 29 चेंडूत 47 धावा करून नाबाद परतला. या पराभवासह हैदराबादचा प्लेऑफच्या शर्यतीतून पत्ता कट झाला आहे. हैदराबादचा 9 सामन्यातील हा आठवा पराभव ठरला आहे. होल्डरव्यतिरिक्त SRH साठी रिद्धिमान साहाने सर्वाधिक 31 धावा केल्या. दुसरीकडे, पंजाबसाठी रवी बिष्णोईने (Ravi Bishnoi) 3 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमीने 2 विकेट घेतल्या. तसेच अर्शदीप सिंहने एक विकेट घेतली. (IPL 2021, DC vs RR: दिल्लीची विजयी घोडदौड सुरूच; शिस्तबद्ध गोलंदाजीने राजस्थानला 33 धावांनी धूळ चारली, सॅमसनची झुंज अपयशी)
टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या पंजाबने निर्धारित 20 षटकात पंजाबला केवळ 125 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात हैदराबादची पुन्हा एकदा निराशजनक सुरुवात झाली. डेविड वॉर्नर अवघ्या 2 धावा करून परतला. शमीने पहिल्याच ओव्हरमध्ये वॉर्नरचा अडथळा दुर केला. त्यानंतर शमीने हैदराबादचा कर्णधार केन विलियमसनला त्रिफळाचित करून संघाला मोठा दिलासा दिला. विल्यम्सनंतर मनीष पांडेकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. तथापि पुन्हा अपेक्षाभंग करून काही अंतराने पांडेला बिष्णोईने माघारी धाडलं. बिष्णोईने केदार जाधवला 12 धावांवर असताना त्रिफळाचित केलं. अब्दुल समद देखील अधिक काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि बिष्णोईच्या गोलंदाजीवर क्रिस गेलकडे झेलबाद झाला. अखेरच्या ओव्हरमध्ये हैदराबादला 16 धावांची गरज होती. क्रीजवर होल्डर फलंदाजी करत होता तर नॅथन एलिसला (Nathan Ellis) पंजाब कर्णधार राहुलने गोलंदाजी सोपवली. एलिसने कर्णधाराचा विश्वास योग्य ठरवलं आणि पंजाब किंग्जचा 5 धावांनी विजय सुनिश्चित केला. अशाप्रकारे होल्डरचे अष्टपैलू प्रयत्न व्यर्थ गेले आणि हैदराबाद प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला.
यापूर्वी पंजाबचा संघ देखील विशेष कामगिरी करू शकला नाही. कर्णधार केएल राहुलने 21 धावा केल्या. तर एडन मार्करमने सर्वाधिक 27 धावा केल्या, तर हरप्रीत ब्रार 18 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, हैदराबादकडून होल्डरने 4 ओव्हरमध्ये 19 धावा करुन सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच संदीप शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि अब्दुल समद यांनीही प्रत्येकी 1 विकेट घेतली.