IPL 2021 in UAE: सिंगापूरचा ‘हा’ क्रिकेटपटू बदलणार विराट कोहलीच्या RCB चे भाग्य? 19 षटकारांसह ठोकल्या 282 धावा
ऑगस्टमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघात टिमचा समावेश करण्यात आला होता. सीपीएलमध्ये टिमची फलंदाजी आरसीबी संघासाठी दुसऱ्या टप्प्यात नक्कीच फायद्याची ठरू शकते.
कॅरिबियन प्रीमियर लीग (Caribbean Premier League) 2021 मध्ये असे अनेक खेळाडू सहभागी झाले होते, जे इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात खेळताना दिसतील. अशा स्थितीत आयपीएलच्या फ्रँचायझी संघांच्या नजराही सीपीएलच्या सामन्यांवर खिळल्या होत्या. सेंट लुसिया किंग्जच्या एका फलंदाजाने CPL 2021 मधील त्याच्या कामगिरीने सर्वाना खूप प्रभावित केले आहे. सिंगापूरच्या टीम डेव्हिडने (Tim David) संपूर्ण स्पर्धेत चमकदार फलंदाजी केली आणि उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने फक्त त्रिनबागो नाईट रायडर्सचा गोलंदाज खैरी पियरेला घाम फोडला. ऑगस्टमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघात टिमचा समावेश करण्यात आला होता. सीपीएलमध्ये टिमची फलंदाजी आरसीबी (RCB) संघासाठी दुसऱ्या टप्प्यात नक्कीच फायद्याची ठरू शकते आणि त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्याचा विचार केला पाहिजे. (IPL 2021: आरसीबीला पहिले जेतेपद मिळवण्याची सुवर्णसंधी, ‘हे’ खेळाडू बनू शकतात मॅच विनर)
टिमने कॅरिबियन प्रीमियर लीगच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात 17 चेंडूंत नाबाद 38 धावांची खेळी केली. या दरम्यान त्याने एक चौकार आणि चार षटकार ठोकले, त्यापैकी त्याने खारी पियरेच्या चेंडूवर सलग तीन षटकार ठोकले. संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत टिम चौथ्या क्रमांकावर आहे. शेवटच्या षटकांत सामन्याचा निर्णय बदलण्यात टिम मास्टर आहे. ताबडतोड फलंदाजी करणारा सिंगापुरचा टिम डेव्हिड सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि आरसीबीला पहिले आयपीएलचे जेतेपद मिळवून देण्यात तो महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. सिंगापूरच्या या खेळाडूने कॅरिबियन प्रीमियर लीग 2021 मध्ये आपल्या फटकेबाजीने सर्वांची मने जिंकली. टिमने 11 डावांमध्ये 282 धावा केल्या, सीपीएल 2021 मध्ये त्याची चौफेर फलंदाजी पाहायला मिळाली.
मधल्या फळीत खेळणारा फलंदाजाने 35 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आणि या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 140 पेक्षा जास्त होता. विशेष म्हणजे टिम डेव्हिडने षटकार आणि चौकारांसह स्पर्धेतील अर्ध्या धावा केल्या. टीम डेव्हिडने षटकार आणि चौकारांसह 282 पैकी 190 धावा केल्या. डेव्हिडने संपूर्ण स्पर्धेत 19 षटकार आणि 19 चौकार मारले. दरम्यान, टीम डेव्हिडला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने केवळ 20 लाख रुपयांमध्ये आपल्या संघात स्थान दिले आहे. तो RCB च्या सर्वात स्वस्त परदेशी खेळाडूंपैकी एक आहे. सिंगापूरचा हा खेळाडू टी-20 विशेषज्ञ मानला जातो ज्याने गेल्या 9 महिन्यांत 6 क्रिकेट लीग - बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीग, द हंड्रेड, टी-20 ब्लास्ट, कॅरिबियन प्रीमियर लीग यासारख्या प्रतिष्ठित क्रिकेट लीग खेळल्या आहेत.