IPL 2021: ‘हा’ धाकड फलंदाज आयपीएलमध्ये करू शकतो हल्लाबोल, Ben Stokes याच्या जागी राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात होऊ शकतो समावेश

आयपीएलच्या 14व्या मोसमातील पहिल्या सामन्यात दुखापत झालेल्या स्टोक्सच्या जागी राजस्थान संघ दक्षिण आफ्रिकेचा धाकड फलंदाज रस्सी व्हॅन डर ड्यूसेनची बदली खेळाडू म्हणून निवड करू शकते.

रस्सी व्हॅन डर ड्यूसेन (Photo Credit: Instagram)

Ben Stokes IPL 2021 Replacement: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आपला स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सच्या जागी बदली (Ben Stokes Replacement) खेळाडूची निवड केली आहे. आयपीएलच्या (IPL) 14व्या मोसमातील पहिल्या सामन्यात दुखापत झालेल्या स्टोक्सच्या जागी राजस्थान संघ दक्षिण आफ्रिकेचा धाकड फलंदाज रस्सी व्हॅन डर ड्यूसेनची (Rassie van der Dussen) बदली खेळाडू म्हणून निवड करू शकते. बोटाच्या दुखापतीमुळे स्टोक्स आयपीएलच्या 2021 मोसमातून बाहेर पडला असून तो मायदेशी परतला आहे. इंग्लंडमध्ये आता स्टोक्सच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात येईल. पंजाब किंग्जविरुद्ध (Punjab Kings) सामन्यात स्टोक्सला दुखापत झाली होती. पंजाबचा स्फोटक फलंदाज क्रिस गेलचा कॅच पकडण्यासाठी डाइव्ह करताना स्टोक्सच्या बोटाला दुखापत झाली. (जोफ्रा आर्चरची IPL 2021 मधून एक्सिट, राजस्थान रॉयल्सला तिसरा धक्का; इंग्लंड बोर्डाने केली घोषणा)

दरम्यान, आफ्रिकी फलंदाजाने फिटनेस टेस्ट क्लियर केल्यावरच त्याचा संघात समावेश करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. Netwerk24 ने दिलेल्या माहितीनुसार आफ्रिदी फलंदाजाची सोमवारी फिटनेस टेस्ट घेतली जाईल. दक्षिण आफ्रिकेचा रासी व्हॅन डर ड्यूसेन  सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याने पाकिस्तानविरुद्ध टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी बजावली होती. त्याने दोन एकदिवसीय सामन्यात 183 धावा आणि दोन टी-20 सामन्यात 86 धावा केल्या होत्या. टी-20 मध्ये त्याचा स्ट्राइक रेट 153.57 होता. त्याने खेळलेल्या दोन वनडे सामन्यांत जबरदस्त शतकही ठोकले होते पण अंतिम वनडे आणि पहिल्या दोन टी-20 सामन्यातून बाहेर बसावे लागले. व्हॅन डर ड्यूसेनने दक्षिण आफ्रिकेकडून 8 कसोटी सामन्यात 34.64 च्या सरासरीने 485 धावा केल्या आहेत. तर 23 एकदिवसीय सामन्यात 80.90 च्या सरासरीने 890 धावा केल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय मध्येही त्याने चांगली कामगिरी केली असून 20 सामन्यांत 41.86 च्या सरासरीने 628 धावा केल्या आहेत.

दरम्यान, राजस्थान रॉयल्स संघ सध्याच्या मोसमात संघर्ष करत आहे. त्यांनी आजवर खेळलेल्या 4 सामन्यापैकी केवळ 1 सामना जिंकला आहे. गुरुवारी आरसीबीविरुद्ध सामन्यात संघाला 10 विकेटने लज्जास्पद पराभव स्वीकारावा लागला होता. राजस्थानच्या यंदाच्या मोसमात आजवर फक्त दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध एकमेव विजय मिळवला आहे. संघाला सध्या त्यांचे दोन महत्त्वाचे सदस्य जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स यांची कमतरता जाणवत आहे. स्टोक्सकडे स्वबळावर संघाला विजय मिळवून देण्याची क्षमता आहे ते आर्चर आपल्या वेगवान गोलंदाजीने विरोधी संघातील फलंदाजांना त्रास द्यायचा.