IPL 2021 Phase-2: इयन मॉर्गनच्या अनुपस्थितीत हे 3 खेळाडू बनू शकतात KKR चे कर्णधार, एक आहे टी-20 स्पेशलिस्ट
अशास्थितीत सर्वाधिक नुकसान कोलकाता नाईट रायडर्सना होणार आहे कारण इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार इयन मॉर्गनकडे संघाच्या नेतृत्वाची धुरा आहे. मॉर्गनच्या अनुपस्थितीत कोलकाताच्या नेतृत्वाची दूर हाती घेण्यासाठी 3 खेळाडू दावेदार बनू शकतात.
Eoin Morgan Captaincy Replacement for IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चे उर्वरित 31 सामने युएई (UAE) येथे सप्टेंबर-ऑक्टोबर विंडोमध्ये आयोजित करण्याचा बीसीसीआयने निर्णय घेतला आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी (IPL Phase-2) इंग्लंड खेळाडू उपस्थित नसल्याचे ECB चे प्रमुख अॅशली जाईल्स यांनी म्हटलं आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) याची पुष्टी केली आहे की ते आपल्या खेळाडूंना इतर कोणत्याही लीगसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक देणार नाही. त्यामुळे इंग्लंडचे टी-20 खेळाडू युएईमध्ये जाणार नाही. अशास्थितीत सर्वाधिक नुकसान कोलकाता नाईट रायडर्सना (Kolkata Knight Riders) होणार आहे कारण इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार इयन मॉर्गनकडे (Eoin Morgan) संघाच्या नेतृत्वाची धुरा आहे. मॉर्गनच्या अनुपस्थितीत कोलकाताच्या नेतृत्वाची दूर हाती घेण्यासाठी 3 खेळाडू दावेदार बनू शकतात. (IPL 2021: इंग्लंड-न्यूझीलंड खेळाडू आयपीएलच्या दुसऱ्या टप्पूयातून बाहेर पडल्यास या 3 संघाचे होणार मोठे नुकसान, प्लेऑफसाठी क्वालिफाय करणे होईल कठीण)
दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)
आयपीएल आणि कर्णधारपदाचा अनुभव पाहता मॉर्गनच्या अनुपस्थितीत दिनेश कार्तिकची स्वयंचलित निवड होऊ शकते. वरिष्ठ विकेटकीपर-फयापूर्वी लंदाजाने 2018 पासून 2020 च्या मध्यापर्यंत फ्रँचायझीचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वात केकेआरने एकदा प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे जर मॉर्गनने आयपीएलच्या दुसर्या टप्प्यात खेळणार नसल्यास केकेआरचा कर्णधार बनण्यासाठी कार्तिक सर्वात प्रबळ दावेदार असू शकतो.
आंद्रे रसेल (Andre Russell)
वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलचा टी-20 क्रिकेटमध्ये खूप अनुभव आहे आणि तो क्रिकेटच्या या छोट्या फॉरमॅटचा तज्ज्ञ खेळाडू मानला जातो. या व्यतिरिक्त, कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये जमैका तालाहवास संघाच्या नेतृत्वाचाही त्याला अनुभव आहे. रसेल कर्णधार बनल्यास संघात काही नावीन्य येऊ शकते आणि मॉर्गनच्या अनुपस्थितीत तो फलंदाज म्हणून वरच्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करू शकतो, ज्याचा संघाला फायदा होईल. टी-20 स्पेशलिस्ट म्हणून रसेल खेळाला अधिक चांगल्याप्रकारे ओळखतो.
शुभमन गिल (Shubman Gill)
पंजाब आणि 2018 वर्ल्ड कप विजेत्या अंडर-19 टीम इंडियाचा उपकर्णधार गिल, या यादीतील आश्चर्यकारक नाव आहे. इतर अनेक संघांप्रमाणेच केकेआर व्यवस्थापन देखील या युवा खेळाडूला संघाची जबाबदारी सोपवू शकतो. यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांना कर्णधारपदाची जबाबदारी दिली असून दोघांनी उत्तम कामगिरी बजावली होती. याशिवाय राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएल 2021 मध्ये युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनची कर्णधार म्हणून निवड केली आहे. केएल राहुलही पंजाब किंग्जचा कर्णधारपद सांभाळत आहेत. अशा परिस्थितीत केकेआर टीम गिलवर दाव लावू शकतो.
केकेआरच्या आयपीएल 14 मधील कामगिरीबद्दल बोलायचे तर आयपीएल पुढे ढकलण्यापूर्वी केकेआरचा संघ पॉइंट टेबलमध्ये 7 सामन्यांत फक्त 2 विजय आणि 5 पराभवांसह 7व्या स्थानावर आहे.