IPL 2021 Final: केएल राहुलला पछाडून रुतुराज गायकवाडने काबीज केली Orange Cap, इतक्या धावांनी फाफ डु प्लेसिसच्या हातून निसटली

त्याने आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 24 धावांचा पल्ला पार करताच 24 वर्षीय गायकवाडने पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलला मागे टाकले. दुसरीकडे, गायकवाडला आजच्या आयपीएल फायनल सामन्यात त्याचा सहसलामी जोडीदार फाफ डु प्लेसिसने काट्याची टक्कर दिली.

रुतुराज गायकवाड (Photo Credit: PTI)

चेन्नई सुपर किंग्सचा (Chennai Super Kings) युवा सलामीवीर रुतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) ऑरेंज कॅप काबीज केली. त्याने आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध 24 धावांचा पल्ला पार करताच 24 वर्षीय गायकवाडने पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलला (KL Rahul) मागे टाकले. आयपीएल (IPL) 2021 च्या 13 सामन्यांमध्ये राहुलच्या 626 धावा होत्या. अंतिम सामन्याच्या चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रुतुराजने लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर फटका खेचुन राहुलला मागे टाकले. गायकवाड आयपीएल इतिहासातील ऑरेंज कॅप (Orange Cap) काबीज सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. त्याच्यापूर्वी सचिन तेंडुलकर, रॉबिन उथप्पा आणि विराट कोहली, अशा भारतीय फलंदाजांनी देखील ऑरेंज कॅप जिंकण्याचा मान मिळवला आहे. दुसरीकडे, गायकवाडला आजच्या आयपीएल फायनल  (IPL Final) सामन्यात त्याचा सहसलामी जोडीदार फाफ डु प्लेसिसने काट्याची टक्कर दिली. दोघे यंदाच्या ऑरेंज कॅप शर्यतीत सक्रिय फलंदाज होते. पण अखेरीस युवा भारतीय फलंदाजाने बाजी मारली. (IPL 2021 Final, CSK vs KKR: फायनलमध्ये Faf du Plessis ‘वन मॅन शो’, चेन्नईची 192 धावांपर्यंत मजल)

अंतिम फेरीत 32 धावा करून रुतुराज बाद झाला. सुनील नारायणने सामनाच्या 9 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शिवम मावीच्या हाती रुतुराजला झेलबाद करून चेन्नईला पहिला धक्का दिला. रुतुराजने 27 चेंडूच्या खेळीत 3 चौकार आणि एक षटकार मारला. तसेच त्याने डु प्लेसिससोबत सलामीची 61 धावांची भागीदारी केली. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात त्याने एकूण 635 धावा केल्या. त्यानंतर डु प्लेसिस एक टोक धरून अखेरच्या चेंडूपर्यंत खेळत राहिला. यादरम्यान त्याने आयपीएल कारकिर्दीतील 22 वे अर्धशतक देखील पूर्ण केले. त्याने डावाच्या अखेरच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी 86 धावांची जबरदस्त खेळी केली. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 3 षटकारही खेचले. आयपीएल 14 च्या अंतिम सामन्यात दणकेबाज खेळी करूनही डु प्लेसिस यंदा ऑरेंज कॅपचा मान मिळवू शकला नाही आणि अवघ्या दोन धावांनी गायकवाडने यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान मिळवला.

आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप-5 फलंदाजांची लिस्ट पाहा...

1. रुतुराज गायकवाड (635)

2. फाफ डु प्लेसिस (633)

3. केएल राहुल (626)

4. शिखर धवन (587)

5. ग्लेन मॅक्सवेल (513)