IPL 2019: Mumbai Indian स्टॅंडबॉय प्लेयर प्रशांत तिवारी याची बोटं कापली, हल्लेखोर म्हणाले 'आता खेळून दाखव'

होळी दिवशी प्रशांत आयपीएल सामन्यांसाठी मुंबईला जाणार होता. दरम्यान, हा हल्ला घडला. आयपीएल 2019 ची सुरुवात शनिवार (23 मार्च 2019) पासून होत आहे. ही स्पर्धा 51 दिवस चालणार आहे.

IPL Player Prashant Tiwari | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

IPL 2019: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेला क्रिकेटपटू प्रशांत तिवारी याचा स्वप्नभंग झाला आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indian) स्टॅंडबॉय प्लेयर प्रशांत तिवारी (Prashant Tiwari) याच्यावर होळीच्या दिवशी दुपारी चारच्या सुमारास जीवघेना हल्ला झाला. हा हल्ला त्याच्या गाझियाबाद (Ghaziabad) येथील घरातच झाला. प्रशांत आणि त्याचा मोठा भाऊ प्रभात याला हल्लेखोर घरातून फरफटत घेऊन गेले आणि त्यांच्यावर काडी आणि लाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्या हल्लेखोरांनी प्रशांत तिवारी याची बोटं कापली. तसेच, बोटं कापल्यवर 'आता खेळून दाखव' असेही आरोपींनी म्हटल्याचा आरोप करण्यात आला आहे.

शेजाऱ्यांवर संशय

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हल्लेखोरांनी प्रशांत तिवारी याच्या दोन्ही हाताची बोटं काचेने कापली. प्रशांत याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याला उपचारासाठी अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात तिवारी कुटुंबीयांचे शेजारी संदीप आणि मंदीप या दोघांवर संशय घेण्यात आला आहे. तसेच, या दोघा संशयीतांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी वृत्त देत म्हटले आहे की, प्रशांत आपला भाऊ प्रभात याच्यासोबत आपल्या घरात मोठ्या आवाजात बोलत होता. यावरुनच संदीप आणि मंदीप यांच्यासोबत तिवारी बंधूंची बाचाबाची झाली. पुढे हे प्रकरण बेदम मारहाणीपर्यंत पोहोचले. (हेही वाचा, IPL 2019 च्या प्रसारणावर पाकिस्तानात बंदी)

51 दिवस चालणार IPL

प्रशांत तिवारी याचे मुंबई इंडियन्स आयपीएल संघात स्टँडबॉय प्लेयर म्हणून निवड झाली होती. होळी दिवशी प्रशांत आयपीएल सामन्यांसाठी मुंबईला जाणार होता. दरम्यान, हा हल्ला घडला. आयपीएल 2019 ची सुरुवात शनिवार (23 मार्च 2019) पासून होत आहे. ही स्पर्धा 51 दिवस चालणार आहे.