IPL Auction 2025 Live

India Vs Australia 4th Test: दुसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया 598 धावांनी पिछाडीवर

सिडनी टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने एकही गडी न गमावत 24 धावा केल्या आहेत.

Rishabh pant and Ravindra Jadeja (Photo Credit: Getty Images)

India Vs Australia 4th Test: सिडनी (Sydney) टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने एकही गडी न गमावत 24 धावा केल्या आहेत. चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्या दमदार खेळीमुळे मजबूत स्थितीत असलेल्या भारतीय संघाने 622 धावांवर डाव घोषित केला. या दोघांशिवाय मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी चांगली खेळी केली. दुसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया 598 धावांनी पिछाडीवर आहे.

पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. लोकेश राहुल (K. L. Rahul) केवळ 9 धावांत तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या मयांक अग्रवाल (77) आणि चेतेश्वर पुजारा (130) यांनी 116 धावांची भागिदारी करत भारताचा डाव सावरला. तर विराट कोहली 23 आणि अजिंक्य राहणे 18 धावा करत बाद झाले. पहिल्या दिवसाअखेर पुजारा 130 धावांवर तर हनुमा विहारी (Hanuma Vihari) 39 धावांवर नाबाद राहिले होते. Cheteshwar Pujara चे दमदार शतक; पहिल्या दिवसाअखेर भारत 303 धावांत 4 बाद

आज खेळाला सुरुवात झाल्यानंतर विहारी 42 धावांवर बाद झाला. नॅथन लॉयनला विहारीला बाद करण्यात यश आले. चेतेश्वर पुजाराची दमदार खेळी सुरुच होती. 193 धावा केलेल्या पुजाराचे द्विशतक मात्र हुकले. त्यानंतर 82 धावांवर जडेजा बाद झाल्यानंतर भारताने डाव घोषित केला. 159 धावांवर ऋषभ पंत नाबाद राहिला.

चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारताने 2 सामने जिंकले आहेत. तर चौथ्या कसोटी सामन्यात भारत मजबूत स्थितीत आहे.