India Tour of England: भारताविरुद्धच्या 5व्या कसोटी सामन्यापूर्वी इंग्लंडचा ‘हिटमॅन’आर्मीला मोठा इशारा, वाचा सविस्तर
277 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 69 धावांत 4 बाद अशी स्थिती असताना जो रूट आणि बेन स्टोक्सने संयमाने फलंदाजी करत यजमान इंग्लंडची बिकट परिस्थितीतून सुटका केली.
India Tour of England 2022: इंग्लंडचे (England) विजयी मार्गाने परतणे ही क्रिकेट जगतासाठी चांगली बातमी असू शकते परंतु रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कंपनीसाठी ही चांगली बातमी नाही. टीम इंडिया (Team India) मागील वर्षी जूनमध्ये सुरू झालेली पाच सामन्यांची कसोटी मालिका पूर्ण करण्यासाठी पुढील महिन्यात ब्रिटनचा दौरा (England Tour) करणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे पण जो रूटने (Joe Root) टॉप गियर पकडल्याने आणि बेन स्टोक्सही (Ben Stokes) लयीत परतला आहे या महत्वपूर्ण दौऱ्यापूर्वी भारतीय संघाची डोकेदुखी वाढली असावी. इंग्लंडची मुख्य चिंता त्यांची फलंदाजी होती. जो रूट व्यतिरिक्त कोणताही आघाडीचा फलंदाज लयीत दिसत नव्हता. तथापि आता बेन स्टोक्सचे कसोटी संघात पुनरागमन आणि नेतृत्वातील बदलामुळे इंग्लंडसाठी परिस्थिती बदलली आहे. (IND vs ENG Test: मोहम्मद सिराजचा इंग्लंडला इशारा, IPL मधील कामगिरी विसरून कसोटीत थैमान घालणार)
277 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेमिसनने सुरुवातीलाच पुन्हा एकदा अडचणीत आणले, पण 69 धावांत 4 बाद अशी स्थिती असताना जो रूट आणि बेन स्टोक्सने संयमाने फलंदाजी करत यजमान इंग्लंडची बिकट परिस्थितीतून सुटका केली. भारताला मालिकेच्या पहिल्या भागात स्टोक्सच्या धोक्याची काळजी करण्याची गरज नव्हती कारण भारतीय वेगवान गोलंदाजांनी रूटनंतर स्टोक्सची विकेट मिळवण्यासाठी तोडगा काढला होता, पण आता तशी स्थिती नाही. भारताला 15 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. भारताने 2007 मध्ये अखेर ब्रिटनमध्ये कसोटी मालिका जिंकली होती. पण इंग्लंडने नऊ सामन्यांच्या पराभवाची मालिका संपवली आहे. रूटने पुन्हा एकदा टॉप गियर पकडला असून कर्णधार स्टोक्सही चांगला फॉर्मात आहे. दुसरीकडे भारतीय संघ संपूर्ण बदलला आहे. विराट कोहलीने कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवले आहे तर अजिंक्य रहाणेलाही वगळण्यात आले आहे. कोहली आणि रोहित दोघेही फॉर्ममध्ये झुंजत असून ऋषभ पंतची स्थितीही तशीच आहे. चेतेश्वर पुजाराने इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली आहे तो महत्त्वाचा ठरेल. अशा परिस्थितीत विराटच्या नेतृत्वात अपुरे राहिलेले काम टीम इंडियाला रोहितच्या नेतृत्वात पूर्ण करण्यासाठी मोठे परिश्रम करावे लागणार आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ 16 जूनला इंग्लंडला रवाना होईल. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह आणि खजिनदार अरुण धुमल यांच्यासह संपूर्ण बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी 1 जुलै रोजी पाचव्या कसोटीसाठी बर्मिंगहॅममध्ये उपस्थित राहतील. दरम्यान कसोटी सामन्यानंतर दोन्ही संघात तीन टी-20 आणि वनडे सामने देखील खेळले जाणार आहेत.